शिक्रा हा पक्षी भारतात सर्वत्रच आढळतो. भारताबरोबर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार अशा अनेक देशात शिक्राच्या उपजाती आढळतात. भारतात आणि इतर काही देशांमध्ये यांना शिकारीसाठी व हौसेसाठी पाळले जाते. पाठीवर फिकट राखाडी रंग, शेपटीवर गडद राखाडी आडव्या पट्ट्या, पोटावर तांबड्या आडव्या रेषा व लाल डोळे यावरून नराची ओळख पटते. मादीचा व तरुण पिल्लांचा रंग हा तपकिरी असून डोळे पिवळे असतात. मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. शिक्राचा आहार म्हणजे छोटे प्राणी व पक्षी, याचबरोबर सरडे, पाली, छोटे साप व बेडूक. मजबूत पंजे व तीक्ष्ण नखांमुळे त्यांना शिकार मिळवणे सोपे जाते.
शिक्रा हा आकाराने साधारण कबुतराएवढा व लांब शेपटीचा पक्षी आहे. याचे इंग्रजी व मराठी नाव हे ‘शिक्रा’ असेच आहे. शिक्रा म्हणजेच शिकारी, उर्दू व पारसी भाषेतून या नावाचा उगम झाला. शिक्राच्या विणीचा हंगाम हा साधारण उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते जूनदरम्यान असतो. यावेळी शिक्राची जोडी कावळ्याप्रमाणेच काड्यांचा वापर करून गोल घरटे बनवते. मादी यात निळसर, पांढऱ्या रंगाची चार ते पाच अंडी घालते. अंडी उबवण्याचे काम फक्त मादीच करते पण पिल्लांना वाढवण्याचे काम नर व मादी दोघे मिळून करतात.
शिक्रा घारींसारखाच गोल गोल घिरट्या घेत हवेत वर तरंगत जातो. छोट्या आकारामुळे उडताना हा सहज ओळखता येतो. उडताना गळ्यावर असलेली गडद उभी रेष स्पष्ट दिसते. शिक्राचा अधिवास म्हणजे विरळ व दाट जंगल, शेती व टेकड्यांचा परिसर, तसेच शहरातील बागा व तत्सम हरित भाग असा असतो. काही वेळा रस्त्यालगत असलेल्या विजेच्या तारांवरसुद्धा यांचे दर्शन होते.
पक्ष्यांमध्ये अनेक शिकारी पक्षी आहेत, त्यात सहज दिसणाऱ्यांमधला एक म्हणजे शिक्रा. लहान पक्षी म्हणजे बुलबुल, चिमण्या, सातभाई यांची लपण्यासाठी धावपळ व आरडाओरडा सुरू झाला व जवळून टीट्यू-टीट्यू-टीट्यू असा आवाज आला की या पक्ष्यांच्या मागावर शिक्राच आहे असे समजावे. खेडेगावात कोंबडीचे पिल्लू पळवून नेताना याला अनेकांनी पहिलेही आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.