पक्षिविश्व – पाकोळी (Swift)

पाकोळी हा पक्षी साधारणपणे चिमणीच्या आकाराचा आहे. पाकोळी हा सर्वांत जलद गतीने उडणारा पक्षी आहे. दिवसातील बराच काळ तो उड्डाणातच घालवतो. साडेसहा हजार मीटर उंचीपर्यंत उडू शकतो. तो जलद गतीने लहानलहान अंतरांत पंख हलवतो. तो अधूनमधून आकाशात नुसता तरंगत राहतो. मात्र त्या दरम्यान पंख शरीरापासून लांब ठेवले जातात. या पक्ष्याचे खाणे, पिणे आणि मीलनसुद्धा हवेतच होत असते. पाकोळी पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या ॲपोडिफॉर्मिस गणाच्या ॲपोडिडी कुलात केला जातो.

हा पक्षी रंगाने काळा अथवा तपकिरी असतो. शरीर मजबूत आणि पंख लांब असतात. पसरलेल्या पंखांची लांबी एक फुटापर्यंत असते. पिसे दगडी, तपकिरी किंवा काळ्या रंगाची असतात. त्याच्या गळा, मान व पोट या भागांवर क्वचित काही खुणा दिसून येतात. डोक्याचा भाग रुंद असतो. चोच अगदीच लहान व बाकदार असते. चोचीच्या खाली एक पांढरा ठिपका असतो. शेपूट लहान किंवा किंचित लांब असून दुभंगलेले असते. पाय आखूड असतात. पायाला चार बोटे असून ती पुढच्या बाजूला असतात. त्यामुळे त्याला जमिनीवर किंवा तारांवर इतर पक्ष्यांसारखे बसता येत नाही. मात्र, बोटांच्या नख्यांद्वारे तो उभ्या पृष्ठभागाला घट्ट पकडून लटकतो. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

पाकोळी पक्षी मानवी वस्तीच्या आजूबाजूला दिसून येतात. ते थव्याने राहतात. हवेतील कीटकांवर तो गुजराण करतो. पाण्यावर झेपावत तो पाण्याचा घोट घेतो. विश्रांती घेताना तो भिंतीला, खडकाला चिकटतो किंवा घरट्यात जाऊन बसतो. जुनाट किल्ले, पडक्या ओसाड इमारती, डोंगरकडा आणि घरांच्या खोबण्या यांमध्ये ते घरटी तयार करतात. या पक्ष्यांचा आवाज मोठा असून ते सतत किलबिलाट करत असतात.

हा पक्षी घरट्यासाठी कागदाचे तुकडे, दोरे, झाडाची पाने इ. वस्तूंचा वापर करतात. या सर्व वस्तू, माती आणि लाळ एकत्र करून ते बशीच्या आकाराचे गोलसर घरटे तयार करतात. विणीच्या हंगामात त्याच्या लाळग्रंथी आकाराने वाढलेल्या असतात. भिंतीचे कोपरे, छते, कोनाडे अशा ठिकाणी ही घरटी चिकटवलेली असतात. बाहेरून ही घरटी दिसायला अव्यवस्थित असली, तरी आतून मऊ असतात. हे पक्षी त्यांच्या घरट्यांत पुन:पुन्हा राहायला येतात. मादी एक ते चार अंडी घालते. साधारणपणे वीस बावीस दिवसांत अंड्यांतून पिले बाहेर येतात. नर व मादी दोघेही पिलांचे संगोपन करतात. पिले सहा ते आठ आठवड्यांत घरटे सोडून जातात.

या पक्षाच्या २० प्रजाती व सुमारे ९५ जाती असून स्विफ्ट च्या बहुतेक जाती स्थलांतर करणाऱ्या आहेत. तो ध्रुवीय प्रदेश, चिली, अर्जेंटिना, द. न्यूझीलंड आणि प. ऑस्ट्रेलिया वगळता जगात सर्वत्र आढळतो. भारतात पाकोळीच्या १७ जाती आढळतात. त्यांपैकी एपस ॲफिनिस असे शास्त्रीय नाव असलेली जाती मुख्यत्वे आढळते. भारतात पाकोळीची आणखी एक जाती आढळत असून तिचे शास्त्रीय नाव एपस एपस असे आहे. तिला ‘कॉमन स्विफ्ट’ असे इंग्रजी नाव आहे. ही जाती आकाराने एपस ॲफिनिस  पेक्षा मोठी असून ती स्थलांतर करते. पाकोळीच्या काही जाती स्व निर्मित ध्वनीमुळे निर्माण झालेल्या प्रतिध्वनीवरून स्थान निश्‍चिती करतात. पाकोळीला संरक्षित पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट केले गेले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा