पक्षिविश्व – सूर्यपक्षी / जांभळा शिंजीर (Purple Sunbird)

28

चिमणीपेक्षा लहान आकाराचा हा पक्षी उगवत्या सूर्याबरोबर मधुरसाच्या शोधात, नुकत्याच उमललेल्या फुलांवर भिरभिरत असतो म्हणून याला मराठीत सूर्यपक्षी व इंग्रजीमध्ये ‘सनबर्ड’ असे म्हणतात. शहरांमध्ये सहजपणे दिसणारा पण अत्यंत चपळ असा हा जांभळा शिंजीर. शहरांमधील अनेक फुलझाडे, वेली, व बहुतेक वेळा गॅलरीतील फुलांवर सुद्धा मधुरसासाठी हा पक्षी येतो. शहराबरोबरच शेती, माळरान, जंगलातही यांचे वास्तव्य असते. जांभळ्या शिंजीर पक्ष्याची व्याप्ती भारतातील काही हिमालयीन भाग वगळता सर्वत्रच पसरलेली आहे. भारताबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व म्यानमार येथेही यांच वास्तव्य आहे.

सुर्यपक्षी किंवा शिंजीर पक्षांची लांब मोठ्या सुई सारखी चोच व त्याच लांबीची जीभ त्यांना फुलाच्या गाभ्यापर्यंतचा मध शोषण्यास मदत करते. मधासोबातच ते लहान कीटक व कोळीही खातात. यांच्या सततच्या उडण्यामुळे त्यांचं निरीक्षण करणे खूप कठीण जाते. क्षणार्धात ते मध पिऊन दुसऱ्या फुलावर गेलेले असतात. मुख्यतः उन्हाळ्याचा सुरुवातीला जेव्हा पळस, पांगारा, काटेसावर, टणटणी, शेवगा, धायटी, कुडा, शिरीष, पर्जन्यवृक्ष अशा झाडांना फुले येतात, त्यावर हे शिंजीर व इतर अनेक पक्षी मधुरसासाठी जमतात. तेंव्हा अनेक वेळा त्यांची भांडणे सुद्धा इथे बघायला मिळतात.

पर्पल सनबर्ड म्हणजेच जांभळे शिंजीर हे जोडीने राहणे पसंत करतात. नर पक्षी फक्त विणीच्या हंगामातच काळ्या-जांभळ्या रंगाचे असतात, इतर वेळी ते मादीच्या रंगाचे म्हणजेच वरील भाग तपकिरी व पोटाकडचा भाग हिरवट पिवळ्या रंगाचा असेच दिसतात. नराच्या चोचीखालून ते पोटापर्यंत असलेली काळी रेघ, व पंखांचा काळा रंग विणीचा हंगाम संपल्यावर सुद्धा तसाच राहतो. विणीच्या हंगामात नर पक्षी झाडाच्या शेंड्यावर जाऊन पंख फडफडवून वेगवेगळे आवाज काढतो. याच क्रियेदरम्यान त्याच्या पंखांमध्ये खांद्याजवळ लपलेली ठळक पिवळ्या-केशरी रंगाची पिसे मादीला आकर्षित करतात.

मिलनानंतर घरटे बांधण्यापासून ते अंड्यातून पिल्ले बाहेर येईपर्यंत सर्व जबाबदारी मादी उचलते. गवताच्या काड्या, सुकलेली पाने, गोणपाटाचे धागे, कोळीजाळेे यासारख्या गोष्टी वापरून पिशवीसारखे लटकते घरटे मादी तयार करते. नर फक्त तिच्या सुरक्षिततेसाठी लक्ष ठेऊन असतो. काही वेळा हे घरटे जमिनीपासून अगदी कमी उंचीवर सुद्धा असते. दिसताना ते कचऱ्यासारखेच दिसते म्हणून बागकाम करणारे लोक, ते चुकून उखडून टाकतात.

झाडे मध देताना पक्ष्यांमार्फत आपल्या फुलांचे परागीभवन करून घेतात. यातूनच फलधारणा उत्तम होऊन चांगल्या बियांची व वृक्षांची निर्मिती होत राहते. या कार्यात सूर्यपक्ष्याचा मोलाचा वाटा असतो. सध्या या पक्षाची संख्या स्थिर आहे व शहरी भागाशी जुळवून घेतल्यामुळे त्यांना फारसे धोके नाहीत, परंतु परदेशी शोभेच्या झाडांमुळे त्यांना अन्न मिळवणे कठीण जाते. त्यामुळे घराजवळ, अंगणात तसेच टेरेस गार्डनवर भारतीय वंशाची फुलझाडे व वेलींची लागवड केली, तर या सुंदर पक्षाचे दर्शन आपल्याला घरात सुद्धा घडू शकते.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा