पक्षिविश्व- भारद्वाज (Greater Coucal)

भारद्वाज हा तांबूस-पिंगट रंगाची पिसे असलेला कावळ्यासारखा दिसणारा एक पक्षी. त्याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस सायनेन्सिस आहे. कोकिळ, पावशा व चातक या पक्ष्यांचा समावेश ज्या कुळात होतो त्याच कुळात म्हणजे पक्षिवर्गाच्या क्युक्युलिफॉर्मिस गणाच्या क्युक्युलिडी कुळात भारद्वाजाचा समावेश होतो. भारद्वाज पक्षी भारत, श्रीलंका तसेच चीन ते इंडोनेशियापर्यंत सर्वत्र आढळतो. तो दाट झुडपे असलेला प्रदेश, शेते, मनुष्यवस्तीला लागून असलेली उद्याने, झाडी या ठिकाणी राहतो. भारद्वाज जास्त उंचीवर उडताना कधीच दिसत नाही, तो या झाडावरून त्या झाडावर, झुडपात लपत छपत उडताना,चालताना दिसतो.

भारद्वाजाच्या शरीराची लांबी दीड फुटापर्यंत असते. पिसांचा रंग तांबूस-पिंगट असून त्यात तपकिरी रंगाची झाक असते. शेपूट लांब, टोकाला रुंद व काळ्या रंगाची असते. चोच काळी व किंचित बाकदार असते. डोळे लालभडक रंगाचे आणि पाय काळे असतात. नर व मादी दिसायला सारखे असतात.

भारद्वाज एकटा किंवा जोडीने वावरतो. कीटक  व त्यांच्या अळ्या, सरडे, उंदराची पिले व छोटे साप हे त्याचे मुख्य भक्ष्य आहे. याखेरीज तो पक्ष्यांची अंडी व पिले, फळे, बिया इ. खातो. तो बऱ्याचदा सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उन्हामध्ये बसलेला दिसतो. सकाळी आणि संध्याकाळी तो सक्रिय असतो. तो जमिनीवर हळूहळू एकेक पाऊल टाकीत किंवा झाडांच्या फांद्यांवर उड्या मारीत भक्ष्य शोधताना दिसतो. तो ‘घुप, कूप घुप कूप’ असा घुमणारा विशिष्ट आवाज काढतो. पुष्कळदा दोन नर-भारद्वाज जवळ असले आणि एकाने आवाज काढला की दुसराही आवाज काढून प्रत्युत्तर देतो. त्यांचे हे आवाज काढणे बराच वेळ चालते.

भारद्वाजाचा प्रजननकाळ जून–सप्टेंबर असतो. या काळात नर व मादी एकत्र येऊन घरटे तयार करतात. घरटे तयार करण्याच्या कामी नर पुढाकार घेतो. घरटे खोल कपासारखे व मोठे असून ते काटक्या, गवत व पाने यांपासून बनविलेले असते. मादी एका खेपेला ३–५ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंडी १५-१६ दिवसांत उबतात. पिले १८–२२ दिवसांनंतर उडण्यास सक्षम होतात.

भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. पूर्वापार चालत आलेल्या प्रथे प्रमाणे काही समाजात, लग्न कार्यात हया पक्षाचा पंख देवक म्हणुन पुजला जातो. सकाळी सकाळी भारद्वाजाचे दर्शन होणे खूप शुभ मानले जाते.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा