पाणकावळा हा एक पाणपक्षी आहे. भारतात लहान पाणकावळ्या सोबतच मोठा पाणकावळा (फॅलॅक्रोकोरॅक्स कार्बो ) व तुर्रेबाज (क्रेस्टेड) पाणकावळा (फॅलॅक्रोकोरॅक्स फसीकोलीस) या दोन जाती आढळतात. पाणकावळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पेलिकनीफॉर्मिस गणाच्या फॅलॅक्रोकोरॅसिडी कुलात होतो. जगात या पक्ष्याच्या चाळीस जाती आहेत. भारतीय उपखंडात लहान पाणकावळा अशा नावाने परिचित असलेली पाणकावळ्याची जाती सर्वत्र आढळते. तिचे शास्त्रीय नाव फॅलॅक्रोकोरॅक्स नायजर आहे. तलाव, सरोवरे, ओढे, कालवे व नदी अशा गोड्या पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी तो पाहावयास मिळतो. अधिक उंचीच्या पर्वतरांगांमध्ये लहान पाणकावळा आढळत नाही.
लहान पाणकावळ्याच्या शरीराची लांबी पाऊण ते एक फूट व वजन अर्ध्या ते पाऊण किलोपर्यंत असते. शरीरावरील पिसांचा रंग काळा असून त्यावर हिरव्या रंगाची तकाकी असते. गळ्यावर पांढरा ठिपका असतो. चोच तपकिरी व निमुळती असून तिच्या टोकावर तीक्ष्ण आकडी असते. पाय आखूड असून बोटे पातळ त्वचेने जोडलेली असतात. शेपूट लांब व ताठ असते. नर व मादी दिसायला सारखेच असतात.
अनेकदा मोठा पाणकावळा हा लहान पाणकावळ्याबरोबर वावरताना दिसतो. आकाराने तो बदकाएवढा असून त्याची पाठ व मान पांढरट रंगाची असते. विणीच्या हंगामात डोके आणि मान यांवर थोडी पांढरी पिसे उगवतात. तुर्रेबाज म्हणजे क्रेस्टेड पाणकावळ्याचे डोके किंचित त्रिकोणी असून डोळे निळे असतात. या डोळ्यांमुळे तो वेगळा दिसतो. जरी याला तुर्रेबाज म्हटले जात असले, तरी त्याच्या डोक्यावर तुरा नसतो. मात्र विणीच्या हंगामात कानाजवळ पांढऱ्या पिसांचा लहान झुबका दिसून येतो.
पाणकावळ्याचा विणीचा काळ मे ते ऑक्टोबर असतो. पाण्यात किंवा पाण्याच्या जवळपास असलेल्या झाडांवर बगळे, करकोचे किंवा इतर पाणपक्ष्यांबरोबर ते घरटी बांधतात. नर व मादी दोघे मिळून काट्याकुटक्या जमवून घरटे बांधतात. घरटे वाटीसारखे असते. मादी ३–५ अंडी घालते. २२ ते २५ दिवसांनंतर पिल्ले बाहेर येतात.
मासे, लहान खेकडे व बेडूक यांवर पाणकावळे उपजीविका करतात. मासे पकडण्यासाठी ते त्यांच्या चोचीचा वापर आकडीप्रमाणे करतात. जड शरीर, लांब व लवचिक मान, टोकाला हुकाप्रमाणे वळलेली चोच आणि बोटांना जोडलेले पडदे यांबरोबर खोल व गढूळ पाण्यातदेखील पाहू शकणारे डोळे यांच्या साहाय्याने हे पक्षी पाण्यात सूर मारून खोलवर जाऊन मासे पकडू शकतात. कधी एकट्याने तर कधी समूहाने ते एकमेकांना ढकलत, पाण्यात डुबकी मारत माशांचा पाठलाग करतात व मिळतील तसे मासे पकडून खातात. त्यांनी चोचीत पकडलेला मासा सहजासहजी सुटत नाही.
पाणपक्षी असूनही पाणकावळ्यांना वारंवार पाण्याबाहेर येऊन पंख कोरडे करावे लागतात. कारण त्यांच्या तैलग्रंथीतून स्रवणारा स्राव इतर पाणपक्ष्यांच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे त्यांचे पंख कमी जलरोधी असतात. खूप वेळ पाण्यात राहिल्यास पिसे भिजून तुटण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी बऱ्याचदा पाणकावळे जलाशयाकाठी एखाद्या खडकावर किंवा झाडाच्या फांदीवर पंख कोरडे करीत बसलेले दिसतात. पाणकावळे मासे, बेडकांच्या संख्येवर नियंत्रण ठेऊन निसर्गसाखळी समतोल ठेवतात.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.