नागपूर नगरी वसविणारे गोंड राजे बख्त बुलंद शहा उईके यांची जयंती साजरी

नागपूर ३१ जुलै २०२४ : जवळपास तीनशे वर्षांपूर्वी (१७०२) नागपूर शहर वसवून या शहराला राजधानीचा दर्जा देणारे गोंड राजे बख्त बुलंद शहा उईके यांच्या जयंती निमित्त सिव्हील लाईन नागपूर येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी व समाज बांधवाच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. सीताबर्डी, वाठोडा, गाडगा, हरिपूर अशी आजुबाजूची बारा गावे मिळवून त्यांनी येथूनच आपला कारभार सुरू केला. नागपूरचे पहिले गोंड राजे बख्त बुलंद शहा यांनी पुर्वी जुम्मा तलाव, जुम्मा गेट यांची निर्मिती केली. आता या जुम्मा तलावाला गांधी तलाव व जुम्मा गेटला गांधीगेट म्हटले जाते.

या जयंती कार्यक्रमा प्रसंगी गंगाताई टेकाम, जिल्हाध्यक्षा नागपूर गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी म्हटले की, गोंड राजे बख्त बुलंद शाह हे गोंड राजवंशाचे कुशाग्र बुद्धीचे थोर शासनकर्ते होते. त्यांनी आपल्या राज्यात चंदा आणि मंडला क्षेत्रातील आणि नागपुर, बालाघाट, सिवनी, भंडारा भागात आणि आसपासच्या साम्राज्याला पण जोडले. छिंदवाड़ा आणि बैतूलचे भाग पण त्यांनी आपल्या साम्राज्यात विलीन केले. ते एक विजय प्राप्ती महान योद्धा होते. पण आजच्या परिस्थितीत दुःख होते की, गोंड राजे बख्त बुलंद शहा यांनी जे राजधानी नागपूर शहर वसविले त्याच शहरात यांच्या वंशजांचे अस्तित्व नाही. ऐतिहासिक वारसा, कार्य, संस्कृती इतर गोष्टी पुसण्याचे तसेच दुर्लक्षित करण्याचे कार्य येथील प्रशासन करीत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून सुराबर्डी येथील गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याचा प्रश्न आहे. नागपूर शहर हे एकमेव केंद्र बिंदू आहे जेथे आदिवासी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना रोजगार, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम मिळावा, आदिवासी समाजाचे अस्मिता, त्यांचे चालीरिती, संस्कृती ही अस्तित्वात राहावे म्हणून गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र सुराबर्डी नागपूरात उभारण्याचा अजून पर्यंत प्रश्न सुटत नसुन तसेच इतर काही अनेक प्रश्न व समस्यांकडे प्रशासन दुर्लक्षित करीत आहेत त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाचे भावना दुखवत आहे असे मत टेकाम यांनी व्यक्त केले. त्यानंतर दिनेश सिडाम अध्यक्ष नागपूर शहर गोंगपा यांनी सांगितले की, नागपूर शहरातील गोंड राजे बख्त बुलंद शहा यांच्या ऐतिहासिक धरोहर नागपूर शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील गडकिल्ले याबाबतीत प्रचार प्रसाराबाबत व आदिवासी समाजामध्ये जनजागृती व्हावी याबाबतीत माहिती दिली.

कार्यक्रमाप्रसंगी गोंडराजे ८ वे वंशज राजे विरेंद्र शहा ऊईके, राजेश इरपाते, दिनेश क्रिष्णा सरोते, शिला मरसकोल्हे अध्यक्ष नागपूर शहर, प्रिती पंधराम, मिनाताई कोकुर्डे, विजय आत्राम, सुधाकर परतेती, सौरभ मसराम, रामभाऊ मडावी, विजय मसराम, प्रविण मडावी व समस्त समाज बांधव कार्यक्रमात उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा