युतीसाठी नेत्याचा बळी!

22
Political thumbnail showing BJP–ADMK alliance in Tamil Nadu. Background features a stylized map of Tamil Nadu with saffron and black tones and the ADMK party flag. In the foreground are prominent political figures: K. Annamalai, Edappadi K. Palaniswami, Narendra Modi, and Amit Shah. Top right corner includes a 'News Uncut' logo.
युतीसाठी नेत्याचा बळी!

न्यूज अनकट,भागा वरखाडे

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या दोन मोठ्या राज्यांत भाजपला अजून मनासारखे यश मिळवता आले नाही, पश्चिम बंगालमध्ये तरी भाजपने लोकसभेच्या किमान निम्म्या जागांपर्यंत मजल मारली होती; परंतु तमिळनाडूमध्ये मात्र भाजप स्वब‍ळावर काहीच करू शकत नाही, याची जाणीव लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने करून दिल्याने आता पुन्हा अण्णाद्रमुकसोबत युती करण्याचा निर्णय भाजपला घ्यावा लागला. अण्णाद्रमुक ज्यांच्यामुळे भाजपपासून दूर गेला, त्या अन्नामलाई यांचा त्यासाठी भाजपने बळी दिला आहे.

Political Twist in Tamil Nadu: BJP Bows, Annamalai Resigns

तमि‍ळनाडूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई हे पक्षाचा चेहरा होते. अतिशय आक्रमकपणे त्यांनी द्रमुकविरुद्ध लढा दिला. द्रमुकचा गैरव्यवहार बाहेर काढला. भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. भाजप वाढवण्याच्या प्रयत्नांत मित्रपक्षांचा अन्यत्र जसा बळी दिला गेला, तसाच प्रयत्न तमिळनाडूत सुरू झाला होता. अण्णाद्रमुकची दोन शकले होण्यात आणि तो भाजपपासून दूर जाण्यात भाजपची वाढती महत्त्वाकांक्षा आणि अन्नामलाई यांचा आक्रमकपणा कारणीभूत होता. तमि‍ळनाडूत द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष एकाआडून एक वेळा सत्तेवर येत होते; परंतु जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाची शकले झाली. अण्णाद्रमुकची जागा आपण घेऊ, असे भाजपला वाटत होते; परंतु राष्ट्रीय पक्षांना तमिळी राजकारणात फारसे स्थान नाही. काँग्रेसने हा अनुभव घेतला आहे.

भाजपलाही आता तो येत आहे. असे असताना गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढच्या निवडणुकीत तमिळनाडूत भाजप सत्तेवर येणार असल्याचा दावा कशाच्या आधारे केला, हे तेच जाणोत. अण्णाद्रमुक बरोबर भाजपची युती झाली आहे. या दोन्ही पक्षांना परस्परांची जाणीव आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर तमिळनाडूतील द्रमुक स्वस्थ बसला नाही. मतदारसंघ पुनर्रचना आणि हिंदी भाषेला विरोध या दोन भावनिक मुद्द्यांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी प्रचाराच्या अग्रस्थानी आणले आहे. दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांनी आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू केली आहे. दक्षिणेतील बहुतांश राज्यांच्या नेत्यांना त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेत होणाऱ्या अन्यायाविरोधात  एकत्र केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टॅलिन यांच्या भाषिक वादाला तमिळीत सही का करीत नाही, असे उत्तर देण्याचा प्रयत्न केला; परंतु मोदी स्वतः गुजराथीत का सही करीत नाहीत, असे प्रत्युत्तर देण्यात आले.

भाजपने अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदी ठेवले असते, तर अण्णाद्रमुक पक्षाने त्यांच्यांशी युती केली नसती. अन्नामलाई यांच्यामुळे दोन्ही मित्रपक्षात एवढा मीठाचा खडा प़डला होता. आता तो दूर करण्यात आला आहे. युती होण्यासाठी अन्नामलाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अण्णामलाई यांच्या राजीनाम्याने तामिळनाडूतील राजकारण तापले आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे सांगितले असले, तरी त्याचा अर्थ काय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांचे आता राजकीय पुनर्वसन केले जाईलही; परंतु मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेल्या नेत्याला युतीसाठी राजीनामा द्यावा लागला, हे स्थानिक कार्यकर्त्यांना फारसे आवडलेले नाही. भाजप वाढवण्यात ज्यांचे मोठे योगदान आहे, त्यांना राजीनामा देऊन दोन पावले मागे यावे लागत असेल, तर युतीसाठी केलेला हा त्याग आहे, की बळी याचा शोध घ्यावा लागेल.

तामिळनाडूत विधानसभा निवडणुका २०२६ मध्ये होणार आहेत. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत झटका दिल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा राज्यात अण्णाद्रमुकसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकची राज्यात काँग्रेससोबत युती आहे. आयपीएसची नोकरी सोडून राजकारणात आलेल्या अन्नामलाई यांनी तामिळनाडूमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात बळकटी दिली होती; परंतु अण्णाद्रमुकसोबतच्या कट्टर संबंधांमुळे पक्षाने जातीय समीकरणांमुळे अण्णामलाई यांचा राजीनामा स्वीकारला आहे कारण अण्णाद्रमुक सरचिटणीस ई पलानीस्वामी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर तामिळनाडूत भाजपच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

अण्णाद्रमुकने भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वासमोर तामिळनाडूतील अन्नामलाई यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवण्याची अट ठेवली होती. त्यानंतर अण्णामलाई यांनी दिल्लीत जाऊन उच्च नेतृत्वाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. अण्णामलाई यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणे फायदेशीर ठरेल का, हे निवडणुकीतच कळेल; पण आतापर्यंत तामिळनाडूत द्रमुकविरोधात लढणाऱ्या अण्णामलाई यांचे पंख कापले गेले आहेत. राज्यात द्रमुक सध्या मजबूत स्थितीत आहे. अन्नामलाई ही मोदी यांची निवड मानली जात होती. ते शाह यांचे विश्वासूही होते. आता ते कोणत्या भूमिकेत दिसणार हे लवकरच स्पष्ट होईल. अन्नामलाई यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत चर्चा सुरू झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक चेहऱ्यांचा विचार केला जात आहे.

यामध्ये केंद्रीय मंत्री एल मुरुगन, तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन आणि नैना नागेंद्रन यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीत सौंदर्यराजन यांचा पराभव झाला. करूर येथे राहणारे अन्नामलाई लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. अन्नामलाई हे तमिळ बरोबरच इंग्रजी, कन्नड आणि हिंदी बोलणारे नेते आहेत. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राज्यातील जातीय समीकरणे लक्षात घेऊन अन्नामलाई यांना राजीनामा द्यायला भाग पा़डले आणि आता नवा नेताही बेरजेचे राजकारण लक्षात घेऊन निवडला जाईल.

भाजप राज्यात आपले अस्तित्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. २०२३ मध्ये अण्णाद्रमुक आणि भाजप वेगळे होण्यामागे अन्नामलाई हे एक प्रमुख कारण मानले जाते. दोन्ही मित्र पक्षांचे प्रमुख चेहरे एकाच गौंडर समुदायातून यावेत अशी भाजपची इच्छा नाही. अन्नामलाई आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम प्रमुख एडप्पाडी के पलानीस्वामी हे दोघेही शक्तिशाली मागास समुदायातील आहेत. दोघेही तमिळनाडूच्या त्याच पश्चिम कोंगू प्रदेशातून आले आहेत जिथे गौंडर्सचे वर्चस्व आहे. अशा स्थितीत व्होटबँक वाढविण्याच्या दृष्टीने या बदलाचा संबंध असू शकतो; मात्र अद्यापपर्यंत भाजपकडून या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तामिळनाडू हे देशातील असे एक राज्य आहे, जिथे त्यांचे नेते वेळोवेळी सनातनच्या विरोधात बोलत असतात. अनेक वेळा असे शब्द ऐकायला मिळाले आहेत, जे इतर धर्माच्या लोकांनाही आवडणार नाहीत; पण आता याच भूमीवरून मोदी यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला आहे. अन्नामलाई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजपने राज्यात आपले अस्तित्व वाढवले होते; परंतु द्रविड पक्षांच्या मजबूत मुळांना आव्हान देणे हे अजूनही कठीण काम आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अण्णाद्रमुकसोबत युती करून तामिळनाडूमध्ये ५ जागा लढवल्या; पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्याची मतांची टक्केवारी केवळ ३.६६ टक्के होती, जी ‘नोटा’ च्या ३.७७ टक्क्यांपेक्षा कमी होती.

द्रमुक-काँग्रेस आघाडीने ३८ जागा जिंकून वर्चस्व राखले होते.  २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने अण्णाद्रमुकसोबत युती करून २० जागांवर उमेदवार उभे केले आणि कन्याकुमारी, कोईम्बतूर दक्षिण, तिरुनेलवेली आणि नमक्कल या ४ जागा जिंकल्या. मतांची टक्केवारी २.६२ टक्के झाली. युतीला एकूण ३३.२९ टक्के मते मिळाली; परंतु सत्ता द्रमुककडे गेली. त्यांना ३७.७ टक्के मते आणि १३३ जागा मिळाल्या. अन्नामलाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पहिल्यांदाच २०२४ च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढल्या. पक्षाने १९ जागांवर उमेदवार उभे केले. चार उमेदवार मित्रपक्षांचे होते. एकही जागा जिंकली नसली, तरी मतांची टक्केवारी ११.१ टक्क्यांवर पोहोचली. ही मजबूत झेप मानली जात होती. कोईम्बतूरमध्ये अन्नामलाई यांनी ४.५ लाख मते मिळविली; परंतु द्रमुकच्या गणपती राजकुमार यांच्याकडून १.१८ लाख मतांनी पराभूत झाले. द्रमुक-भारत आघाडीने ३९ पैकी ३९ जागा जिंकून भाजपचा मार्ग पुन्हा कठीण केला आहे.

२०१९ ते २०२४ दरम्यान भाजपच्या मतांची टक्केवारी ३.६६ टक्क्यांवरून ११.१ टक्क्यांपर्यंत वाढणे हे अन्नामलाई यांच्या मेहनतीचे फळ मानले जाते. अन्नामलाई यांनी एन मॅन एन मक्कल (माझी माती, माय लोक) या मोर्चाद्वारे २३४ विधानसभा मतदारसंघात मोर्चा काढला. त्यांनी शहरी आणि निमशहरी भागात भाजपला प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यांची आक्रमक शैली आणि द्रमुकवरील भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे पक्षाला नवी ओळख मिळाली. कोईम्बतूर, चेन्नई आणि निलगिरीसारख्या भागात भाजपने अण्णाद्रमुकला मागे टाकले आणि दुसरे स्थान मिळवले, जे सर्वांसाठी धक्कादायक होते. आता पुन्हा एकदा अण्णाद्रमुक आणि भाजप एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यामुळे अन्नामलाई नाराज असल्याचे बोलले जात आहे. तमिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वात काँग्रेस-डावे पक्ष तसेच काही दलित संघटना व मुस्लीम लीग अशी सामाजिकदृष्ट्या भक्कम आघाडी आहे. त्याला रोखण्यासाठी अण्णाद्रमुकचे सध्याचे नेतृत्व अजिबात सक्षम नाही. राज्यात भाजपच्या विस्ताराला मर्यादा पडतात. या गोष्टी पाहिल्या तर अण्णाद्रमुक-भाजप यांची पुन्हा युती होणे ही दोन्ही पक्षांची गरज होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा