भाजप आणि पंतप्रधान फक्त मुठभर भांडवलदारांचा विचार करतात: जयंत पाटील

अकोला, ८ फेब्रुवरी २०२१: काल जयंत पाटील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत होते, यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तसेच देशात वाढत चाललेल्या पेट्रोल डिझेलच्या किमती वरून केंद्र सरकारवर हल्ला केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आरोप करत म्हंटले की, भाजप आणि पंतप्रधान फक्त मुठभर भांडवलदारांचा विचार करत आहेत. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. ज्या संसदेच्या पायथ्याशी मोदी नतमस्तक झाले, तीच संसद आज द्वेषापाई बदलली जात आहे. त्याजागी नवीन संसद बनवली जात आहे.

सध्या देशात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच अर्थ व्यवस्था देखील मोडकळीस आली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था भाजपने कमकुवत केली आहे म्हणून यांना इंधनावर कर आकारावे लागत आहेत. त्यामुळे इंधनाचे दर वाढवले जात आहेत. अशा लोकांशी आपल्याला पुढे सामना करायचा आहे, त्यामुळे आपण आपले संघटन मजबूत करा.

पक्षाबद्दल बोलताना ते म्हणाले की, अकोला येथे अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मला विश्वास आहे की, पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस चांगली कामगिरी करेल. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक विचार आहे. फुले -शाहू -आंबेडकरांच्या विचारांना गती देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. आपण अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पक्षाची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा