कल्याण: ठाकरे सरकार येण्यापूर्वी अचानक सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे तेव्हा देखील महाराष्ट्रातील अनेकांना धक्का बसला होता. हे राजकारण आहे. येथे काहीही होऊ शकतं हे यावरुन समोर आलं होतं. त्यानंतर पुन्हा एका कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांसोबत पोस्टरमध्ये अजित पवार यांचा फोटो दिसला. भाजप नेत्यासोबत अजित पवार यांचा फोटो असल्याने साहजिकच चर्चा रंगणार. कल्याणमधील देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. पण यावेळी चर्चा तेव्हा रंगू लागल्य़ा जेव्हा या कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांसोबत पोस्टरमध्ये अजित पवार यांचा फोटो दिसला. बॅनरवर देवेंद्र फडणवीस, भाजपवासी झालेले गणेश नाईक आणि स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या सोबत अजितदादा पवार यांचा फोटो लावण्यात आला होता.
यावर उत्तर देतांना भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलं की, ‘अजितदादा हे देखील येणार होते. पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. हा कबड्डीचा खेळ होता. देवेंद्र चषक असला तरी या खेळाचे अध्यक्ष अजितदादा आहेत. त्यामुळे अजितदादांचा फोटो लावण्यात आला आहे.’