मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ : छत्रपती संभाजी नगर येथील लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केलाआहे. भागवत कराड यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर विरोधी बाजूने उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून उध्दव ठाकरे यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.
मागील काही दिवसांपूर्वी कल्याणच्या जागेवर भाजप आमदारांनी दावा केला आहे. त्यानंतर आता छत्रपती संभाजी नगर येथील लोकसभेच्या जागेवर भाजपने मागणी केली आहे. इतकच नाही तर त्या जागेवर भाजपने थेट दावाच सांगितला आहे. शिवसेनेची ताकद कमी झाल्याने ही जागा भाजपला मिळावी असे भागवत कराड यांनी म्हटले आहे. तर त्यांनी ती जागा लढवण्याची तयारीही दर्शविली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रातील २७ मतदार संघांमध्ये जाणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश आहे. यावेळी ते प्रमुख पक्ष कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या बैठका घेणार आहेत. या दौऱ्यात ते प्रत्येक मतदार संघाला एक दिवस वेळ देणार आहेत. बावनकुळे यांचा दौरा सुरू होत असतानाच भागवत कराड यांनी छत्रपती संभाजी नगरच्या जागेवर दावा सांगितलेला आहे ही महत्त्वाची बाब आहे.
शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक पातळीवर ताकत वाढलेली आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळावी ही सर्वांचीच अपेक्षा आहे. मी इच्छुक उमेदवार आहे, परंतु निर्णय मात्र पक्ष आणि संघटना घेईल. पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य असेल. त्या पद्धतीने आम्ही काम करू पण कुठल्याही परिस्थितीत एनडीएचा उमेदवार निवडणूक आणणार. त्या पद्धतीने काम करू असे भागवत कराड म्हणाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर