भाजपला हिंदू धर्माशी देणेघेणे नाही, राहुल गांधींची पॅरिसमध्ये भाजपा वर टीका

पॅरिस, ११ सप्टेंबर, २०२३ : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांच्या युरोप दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी पॅरिसमधील सायन्स पो युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. आमच्या इंडिया आघाडीच्या नावाने सरकार चिडले आहे, या कारणामुळे त्यांना देशाचे नाव बदलायचे आहे. सत्ताधारी भाजपला कसेही करून सत्ता मिळवायची आहे. या पक्षाच्या आचरणाचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

फ्रान्सची पॅरिसस्थित अग्रगण्य समाजविज्ञान संस्था सायन्सेस पीओ विद्यापीठात, विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांनी या वेळी आपली ‘भारत जोडो यात्रा’ही भारतातील लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी काढण्यात आलेली. विरोधी पक्षाची इंडिया आघाडी, बदलती जागतिक व्यवस्था अश्या प्रमुख मुद्द्यांवर गांधी यांनी या कार्यक्रमात चर्चा केली.

राहुल गांधी यांनी देशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, भाजप आणि आरएसएस भारतातील खालच्या जाती, मागास जाती आणि इतर अल्पसंख्याकांची अभिव्यक्ती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असा भारत नको आहे जिथे लोकांशी गैरवर्तन होईल. भाजपच्या विचारसरणीवर राहुल म्हणाले की, मी कधीही कोणत्याही हिंदू पुस्तकात वाचले नाही किंवा कोणत्याही हिंदू विद्वानांकडून ऐकले नाही की, तुम्ही तुमच्यापेक्षा कमजोर असलेल्यांना नुकसान पोहोचवा. हे भाजपचे लोक हिंदू राष्ट्रवादी नाहीत. त्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करतात. शीख समुदायासह भारतातील २० कोटी लोक अस्वस्थ आहेत. ही आमच्यासाठी शरमेची बाब आहे. हे निश्चित करणे आवश्यक आहे. अस्वस्थ वाटणारे अल्पसंख्याकही आहेत. अशा महिलाही आहेत ज्यांना सुरक्षित वाटत नाही.

मी गीता वाचली आहे. उपनिषदे वाचली आहेत आणि अनेक हिंदू पुस्तकेही वाचली आहेत. या आधारावर मी म्हणू शकतो की, भाजप जे काही करत आहे
त्यातून माझ्या असे निदर्शनास आले, की भाजपचे आचरण हिंदू धर्माप्रमाणे अजिबात नाही. एखाद्या कमजोर व्यक्तीला भीतीच्या सावटाखाली ठेवावे, त्याला इजा पोहोचवावी, त्याचे नुकसान करावे, असे मी एकाही हिंदू धर्मग्रंथांत वाचले नाही अथवा कुणा हिंदू विद्वानाकडून ऐकलेही नाही. हिंदू राष्ट्रवाद हा विचार आणि शब्द चुकीचा आहे. ते हिंदू राष्ट्रवादी नाहीत. त्यांना हिंदू धर्माशी काहीही देणे-घेणे नाही. कुठलेही मोल चुकवून त्यांना सत्ता मिळवायची-टिकवायची आहे. त्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत. त्यांना काही मोजक्या व्यक्तींच्या हातात सत्ता हवी आहे. त्यांच्यात हिंदू धार्मिकता वगैरे काही नाही.

भारत-इंडिया या देशाच्या नावावरून सुरू झालेल्या वादावर राहुल गांधी म्हणाले, की, राज्यघटनेत देशाची व्याख्या इंडिया म्हणजेच भारत, संघराज्य अशी करण्यात आली आहे. सर्व राज्ये इंडिया किंवा भारत निर्माण करण्यासाठी एकत्र आली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा आवाज व्यवस्थित ऐकला जातो. कोणताही आवाज दाबला जात नाही किंवा धमकी देऊन बंद केला जात नाही. राहुल गांधी आज नॉर्वेची राजधानी ओस्लोला जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते तिथे एका प्रवासी कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. G20 शिखर परिषद संपल्यानंतर १३ सप्टेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा