भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, उद्धव ठाकरे यांची अमरावतीच्या सभेतून घणाघाती टीका

अमरावती, १० जुलै २०२३ : शिवसेनेतील फूट आणि सध्याच्या राजकीय घडामोडीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज अमरावतीत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपचा उल्लेख नामर्द, घरफोडे आणि घरचेभेदी असा केला. तर भाजपला सत्तेची मस्ती आल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.

तुमच्यावर ही वेळ का आली? मस्ती आणि आत्मविश्वास हे दोन शब्द आहेत. यातील भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. पण त्यांना त्यांच्या ताकदीचा आत्मविश्वास नाही. निवडून येऊच शकत नाही ही धाकधूक आहे. त्यामुळेच समोर कुणालाच ठेवत नाही. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या, असे आव्हानच ठाकरे यांनी दिले. राजकारणातील नामर्द तुम्ही. तुमची ताकद कधी होती?, असा सवाल त्यांनी केला.

मी घरी बसून होतो, मान्य आहे. पण मी कुणाची घरे फोडली नाही. घर फोडे तुम्ही आहात. मी घरी बसून जी कामे केली, ती तुम्हाला घरे फोडून करता आली नाही. तुम्हाला दारे उरली नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही. त्यामुळेच शासन आपल्या दारी सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यक्रमात गर्दीसाठी बसवले जात आहे. ही वेळ का आली तुमच्यावर? कामे केली असती तर असे कार्यक्रम घेण्याची तुम्हाला वेळ आली नसती, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

तुम्हाला माणसे विकत घेता येतात. आमदार विकत घेता येतात असे मी पाहतोय. पण आदिवासी भागातील माणस वाचवा ना? तुम्हाला मतदारही विकत घ्यायची गरज पडणार नाही. फक्त फोडाफोडी सुरू आहे. सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझे नाव येत होते. जगात नरेंद्र मोदी नंबर एकचे पंतप्रधान आहेत. तरीही इतर पक्ष का फोडत आहात? कशासाठी? असा सवाल त्यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानेच आम्ही बाहेर पडल्याचा दावा शिंदे गटाचे लोक करत होते. अरे भुजबळ हे मातोश्रीवर आले होते. बाळासाहेबांना भेटले होते. सर्व मिटले होते. जर बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळाच्या मांडीला मांडी लावून मी बसलो होतो. तर तुम्ही भुजबळांच्या कशाला काय लावून बसला आहात? म्हणजे मांडीला मांडी, हाताला हात, डोक्याला डोक. असे म्हणायचे होते मला, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढताच एकच हशा पिकला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा