भाजप नेत्याने पत्नीची गोळ्या घालून केली हत्या, नंतर स्वतः ही केली आत्महत्या

बिहार, 17 जून 2022: बिहारमधील मुंगेरमध्ये एक खळबळजनक घटना घडलीय. येथे भाजप नेते अरुण यादव यांनी त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर भाजप नेत्यानेही आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण यादव यांच्या पत्नी प्रीती कुमारी महापौरपदाच्या उमेदवार होत्या. या घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण आहे.

प्रीती कुमारी यांनी महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला जाण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून वाद झाला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोन देशी बनावटीची पिस्तुले जप्त केली आहेत.

हे प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाल दरवाजा परिसरातील आहे. भाजप नेते बडा बाबू म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुण यादव यांच्या घरातून जेव्हा गोळी झाडण्यात आली तेव्हा लोक घाबरले. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक घरी पोहोचले तेव्हा बेडरूमला आतून कुलूप होतं. यानंतर लोकांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता पती-पत्नीचे मृतदेह पडलेले दिसले.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण यादव हे भाजपच्या ओबीसी मोर्चात जिल्हा उपाध्यक्ष होते. त्याच वेळी त्यांच्या पत्नी प्रीती कुमारी भाजपच्या नेत्या होत्या आणि मुंगेर महापालिका निवडणुकीत महापौरपदाच्या उमेदवार होत्या. दोघांनाही मूलबाळ नाही.

वैचारिक मतभेदांमुळं घटना घडली!

पती-पत्नीमधील वैचारिक मतभेद हे या घटनेचं कारण असल्याचे सांगितले जात आहे. यावेळच्या महापालिका निवडणुकीत अरुण यादव यांनी पत्नी प्रीती देवी यांना महापौरपदाच्या उमेदवार म्हणून आणलं होतं आणि निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर ते त्यांच्या पत्नीला महापौरपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. याबाबत अरुण यादव हे सातत्याने परिसरातील जनतेशी संवाद साधत होते.

गेल्या तीन दिवसांपासून अरुण यादव पत्नी व समर्थकांसह प्रचार करत होते, मात्र कडक उन्हामुळं पत्नी प्रीती देवी यांना प्रचारात जायचे नसल्यानं बुधवारपासून दोघांमध्ये तणावाचं वातावरण होतं. त्याचबरोबर हत्येचे आणि आत्महत्येमागील कारण समजू शकले नसल्याचे मृताचे काका सत्यनारायण यादव यांनी सांगितलं. गोळी झाडली तेव्हा खिडकीतून दिसले, दोघांचे मृतदेह पडलेले होते आणि दोघांच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या.

दोघांच्या डोक्यात गोळी लागली

त्याचवेळी या प्रकरणी एसएचओ डीके पांडे यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले. खोलीतून पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. दोघांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे. ही घटना कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा