राऊतांच्या त्या’ आक्षेपार्ह टीकेवरुन भाजपा नेते संतापले, एफआयआर दाखल करण्याची मागणी

मुंबई, 10 डिसेंबर 2021: संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून 12 खासदारांचं निलंबन करण्यात आल्याने विरोधकांकडून संसदेबाहेर निदर्शनं केली जात आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिथे हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी शरद पवारांसाठी संजय राऊत खुर्ची आणत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर भाजप नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. मात्र या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप आहे.
एकीकडे महापौरांविरोधात अपशब्द वापरल्यानंतर आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असताना आता भाजपा नेत्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेत प्रत्यारोपाला सुरुवात केली आहे. आशिष शेलार यांच्या समर्थनार्थ मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनबाहेर जमलेल्या भाजपा नेत्यांनी संजय राऊतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटलं की, “आशिष शेलार यांच्यावर कारण नसताना राजकीय आकसापोटी गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत याचं वक्तव्यही आक्षेपार्ह असून शिवराळ भाषा आहे. त्यांनी त्याचा पुनरुच्चारही केला. मग त्यांच्यावर कारवाई नाही करणार? कारवाई झाली नाही तर आम्ही हटणार नाही”.
अतुल भातखळकर यांचीही टीका
मी केलेला ट्विटवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना अतिशय आक्षेपार्ह शब्द वापरला आहे. त्या शब्दाचा देखील मी उच्चार करू शकत नाही. हा शब्द त्यांनी भाजप नेते, भाजप महिला नेत्या या सर्वांविरुद्ध वापरला आहे. अत्यंत असभ्य, घाणेरडा शब्द वापरला जो मी उच्चारु शकत नाही, कारण मी महाराष्ट्राची संस्कृती पाळणारा मनुष्य आहे. संजय राऊतांनी एकदा नव्हे, दोनदा तो घाणेरडा शब्द भाजपा आणि खासकरुन भाजपाच्या महिलांच्या बाबतीत वापरला. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली असून एफआयआर दाखल करावा अशी आमची मागणी आहे. याविरोधात राज्य महिला आणि केंद्रीय महिला आयोगाकडे संजय राऊतांविरोधात तक्रार देणार आहोत,” असं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1468469913127841793?s=20
संजय राऊत नेमकं काय म्हणाले –
संजय राऊत यांना दिल्लीत पत्रकार परिषदेत शरद पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या व्हायरल फोटोवरुन भाजपा नेते टीका करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “लालकृष्ण अडवाणी जरी तिकडे असते तर मी त्यांनाही मी खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते आंदोलनात माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. त्यांच्या पायाला त्रास आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतुल्य, वडीलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली हे जर कोणाला आवडलं नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे”.
“कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधं उभंही राहू दिलं नाही, खुर्चीचं तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा