भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर अवघ्या दीड महिन्यात ज्यांचा जन्म झाला आणि २६ वर्षांच्या वयात जे आमदार झाले, त्या नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांच्यांशी संबंध असलेल्या आणि बिहारमधील राजकीय घडामोडीची खडा न् खडा माहिती त्यांना देणाऱ्या नबीन यांच्यावर आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जगातील सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपला आता दक्षिणायन करून तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगाल पादाक्रांत करायचा आहे, हे आव्हान त्यांच्यापुढे असले, तरी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या छत्रछायेखाली त्यांचा कारभार चालणार असल्यामुळे त्यांना त्याचा ताण येण्याचे काहीच कारण नाही.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात आता जन.झेडने आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. जगभर आता जन. झेड क्रांतीची मशाल हाती घेत असताना भारतातही ते व्हावे, अशी राहुल यांची एकीकडे इच्छा असली, तरी राहुल यांच्या पक्षाची धुरा अजूनही जख्खड म्हाताऱ्यांच्या हातात आहे. निवडणूक जिंकून द्यायला युवक आणि पदे मात्र ज्येष्ठांना यामुळे तर काँग्रेसला कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांत फटका बसला. यालट, सत्तेतील महत्त्वाची पदे जरी भाजपची ज्येष्ठ मंडळी भूषवत असली, तरी संघटनात्मक तसेच अन्य पदांवर युवक आणि मध्यमवयीनांची वर्णी लावून भाजपने संतुलन साधले आहे. आता मोदी हे ही जन. झेडला आकर्षित करीत आहे. पश्चिम बंगालमधील त्यांचे भाषण ऐकले, तर त्यात त्यांनी युवकांच्या भावनांना हात घातलेला दिसतो. दिल्लीत मोदी यांच्याविषयी आयोजित पुस्तक प्रदर्शनामागेही जन. झेडच्या भावनांचा उद्रेक न होता ते आपल्याबरोबर कसे राहतील, ही व्यूहनीती होती. आता त्याचे पुढचे पाऊल म्हणून जगातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाची धुरा ४५ वर्षांच्या नवीन नबीन यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
नबीन यांच्यासाठी ही स्वप्नवत घडामोड आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची बढती भाजपमध्ये एका पिढीतील बदलाचे संकेत देते. कारण पक्ष राष्ट्रीय राजकारणावर आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. नबीन यांना नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय केवळ एक महत्त्वाचा संघटनात्मक निर्णयच नाही, तर राष्ट्रीय राजकारणाला एक स्पष्ट संदेशदेखील देतो. संदेश असा आहे, की भाजपमध्ये नेतृत्वाचा मार्ग वय किंवा वंशावळीने नव्हे, तर कठोर परिश्रम, ऊर्जा आणि संघटनात्मक क्षमतेने ठरवला जातो. केवळ ४५ वर्षांच्या वयात नबीन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून, पक्षाने हे सिद्ध केले आहे, की भाजप भविष्यातील राजकारणावर लक्ष ठेवून तरुण नेतृत्व जोपासते. दुसरीकडे, काँग्रेसचे नेतृत्व ८३ वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे यांच्या खांद्यावर आहे. नबीन यांची नियुक्ती ही केवळ एक नियुक्ती नाही, तर पक्षातील पिढ्यानपिढ्या होणाऱ्या बदलांचे प्रतीक आहे.
१९८० मध्ये स्थापनेपासून, पक्षाने अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि कुशाभाऊ ठाकरे यांसारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपला वैचारिक आणि संघटनात्मक पाया मजबूत केला. त्यांच्या पाठोपाठ, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्यासह दुसऱ्या पिढीने, तर धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, प्रल्हाद जोशी आणि अनुराग ठाकूर यांच्यासह तिसऱ्या पिढीने पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा विस्तार केला आणि पक्षाला सत्तेत आणले. आता चौथी पिढी म्हणून भाजपने नबीन यांची निवड केली आहे.नबीन हे भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यापूर्वी हा विक्रम शाह यांच्या नावावर होता. त्यांनी ४९ व्या वर्षी पक्षाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्यापूर्वी नितीन गडकरी ५२ व्या वर्षी अध्यक्ष झाले होते. ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय जनसंघाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे कमी वयात अध्यक्ष झाले होते. या निर्णयाने भाजपने तरुणांना थेट संदेश दिला आहे, की वय हा पक्षात अडथळा नाही. नबीन हे कायस्थ समुदायातून येतात. त्यांची संख्या निवडणुकीच्या राजकारणात निर्णायक मानली जात नाही. असे असूनही, त्यांना सर्वोच्च पक्षाच्या पदावर नियुक्त केल्याने हे दिसून येते, की भाजप नेतृत्व निवडीमध्ये जातीच्या अंकगणितापेक्षा संघटनात्मक क्षमता आणि राजकीय समजुतीला प्राधान्य देत आहे. संघटनेत काम करणारा, जमिनीशी जोडणारा आणि निवडणूक आव्हाने समजून घेणारा कार्यकर्ता वरच्या स्थानावर पोहोचू शकतो.प्रादेशिक संतुलनाच्या दृष्टिकोनातून नबीन यांची निवड महत्त्वाची आहे. ते बिहारचे आहेत आणि पूर्व भारतातील पहिले भाजप राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यावरून स्पष्ट होते, की पक्षाचे लक्ष हिंदी पट्ट्यापुरते किंवा पश्चिम भारतापुरते मर्यादित नाही. भाजप बिहार, बंगाल, ओडिशा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आपली पकड मजबूत करू इच्छित आहे आणि नबीन यांच्यावर नेतृत्व सोपवून पक्ष ही रणनीती मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुण असले, तरी नबीन कमी अनुभवी नाहीत. २००६ मध्ये त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. तेव्हा त्यांनी पाटणा पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकली आणि पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हापासून त्यांनी सलग पाच वेळा ही जागा जिंकली आहे.
राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी रस्ते बांधकाम, शहरी विकास आणि गृहनिर्माण आणि कायदा अशी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा (भाजप) चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांनी अनेक राज्यांमध्ये संघटना प्रभारी म्हणून काम केले. सिक्कीम आणि छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये संघटना प्रभारी म्हणून तसेच निवडणूक रणनीती आखण्यात त्यांची भूमिका पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने गांभीर्याने घेतली. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना मोदी यांनी एक लाख नवीन तरुणांना राष्ट्रीय राजकारणात आणण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे इतर पदाधिकारी वारंवार सार्वजनिक व्यासपीठावरून तरुणांना नेतृत्व देण्याबद्दल बोलले आहेत. पक्षाध्यक्ष म्हणून नबीन यांची नियुक्ती हे त्याचेच लक्षण आहे.
– भागा वरखडे












































