नवी दिल्ली, २३ जुलै २०२३ : मणिपूर राज्यात दोन समाजात सुरू असलेल्या वादामुळे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्यक्षात या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतरही मणिपूर शांत करण्यास केंद्र सरकारला यश मिळालेले नाही. दरम्यान, मे महिन्यात घडलेल्या एका विकृत घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. इतकंच नाही, तर सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या व्हिडीओची दखल घेत प्रतिक्रिया दिली. यानंतर विरोधकांनी आरोप केला की, मणिपूरमध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक हिंसाचार होत असताना मोदी गप्प होते. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर मोदी बोलले. आता मणिपूरमधील भाजपाच्या एका आमदारानेही मोदींच्या भूमिकेवर आणि प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मणिपूरमधील सत्ताधारी भाजपाचे आमदार पाओलीनलाल हाओकिप बोलतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूर हिंसाचारावर मौन सोडण्यासाठी एक व्हिडीओ व्हायरल व्हावा लागला, हे खूप दुर्दैवी आहे. अशाप्रकारचा हिंसाचार होत असेल, तर ७९ दिवसांचा उशीर तर सोडाच, पण एक आठवडा उशीर होणे म्हणजे खूप मोठा काळ आहे. ही शांतता बधिर करणारी आहे. कुकी समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम चुकत आहे. मी स्वतः पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याआधी कुकी समाजाच्या प्रतिनिधी मंडळाच्या भेटीसाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आजही आम्ही पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मिळण्याची वाट पाहतो आहे. जेणेकरून आम्ही त्यांना मणिपूरमधील परिस्थितीचं गांभीर्य ओळखून देऊ शकू असं हाओकिप यांनी सांगितल.
आमदार पाओलीनलाल हाओकिप पुढे म्हणाले, की माझ्या समाजाचा नेता म्हणून ही परिस्थिती माझ्यासाठी खूप निराशाजनक आहे. एक देश म्हणून आपल्या सर्वांना पक्षांच्या पलिकडे जाऊन विचार करायला पाहिजे. आज ज्या कुकी समाजावर अत्याचार होत आहे, त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण करण्यात मणिपूरचे मुख्यमंत्री आघाडीवर होते. आम्हाला राज्य सरकारकडून न्यायाची कोणतीही अपेक्षा नाही. मणिपूरमधील जो व्हिडीओ व्हायरल झाला त्यातील घटनेसारख्या चार घटना घडल्या आहेत. या घटनांची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्री बिरेन सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदींना व्हिडीओची आवश्यकता आहे का? अशा अमानवी घटनांविरोधा कारवाई करणे राज्य सरकारची जबाबदारी नाही का? व्हिडीओ समोर आल्यावर आपल्याला या घटनेविषयी कळाल्याचं मुख्यमंत्री बिरेन सिंह सांगतात. पण ही घटना दोन महिन्यांपूर्वीच घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असं बोलून या घटनांवर सारवासारव करत आहेत. असे बोलत आमदार पाओलीनलाल हाओकिप यांनी भाजपा वर टीका केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे












































