पुण्यातील लॉक डाऊनला भाजपचे खासदार गिरीश बापट यांचा विरोध

पुणे, दि. ११ जुलै २०२०: काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये येत्या सोमवारी म्हणजेच १३ जुलै रोजी कडक लॉक डाऊन घोषित केले आहे. पुण्यातील कोविड -१९ चे वाढते प्रमाण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर आता भाजपचे नेते गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा विरोध करत त्यांनी म्हटले आहे की हा निर्णय घेत असताना त्यांना विश्वासात घेतले गेले नव्हते.

ठरावीक प्रतिबंधित भागासाठी पूर्ण पुणेकरांना प्रतिबंध का लावले जात आहे, याबाबत टीका करत भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी असे म्हटले की, ‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण तीन टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाउनसारखा सोपा आणि मोठा निर्णय घेऊ नका,’ असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या सरकारने अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअंतर्गत नुकतेच अनलॉक टू घोषित करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्य सरकारने देखील मिशन बिगीन अगेन मोहीम रावत काही उद्योग धंदे व कंपन्यांना हळूहळू आपला उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तर दुसर्‍या बाजूला पुण्यामध्ये लॉक डाऊन करणे हे कोणत्या प्रकारचे धोरण आहे? असा प्रश्न देखील गिरीश बापट यांनी विचारला. दरम्यान, या लॉक डाउन चा विरोध पुणे शहर व्यापार संघाने देखील केला आहे.

काल घेण्यात आलेला निर्णय

पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेलीमध्ये १३ ते २४ जुलै या काळात संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. पहिले पाच दिवस या भागात कठोर लॉक डाऊन असेल. पहिल्या पाच दिवसांत केवळ दूध वितरण तसेच औषधे दुकाने आणि रुग्णालये सुरू राहातील. वृत्तपत्रांचे वितरणही या काळात सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा