भाजप नगरसेवकासह चौघांची हत्या,भुसावळात गोळीबार…

भुसावळ : शहरातील आरपीडीरोडवरील लाल चर्चसमोर रविवारी (दि.६) रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास भाजपचे नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या खरात यांच्यासह त्यांची दोन मुले आणि मोठ्या भावावर पूर्ववैमनस्यातून चाकूहल्ला तसेच गोळीबार झाला. या घटनेत चौघे ठार झाले, तर नगरसेवक खरात यांच्या पत्नी आणि दोन मुले व अन्य एक असे चौघे गंभीर जखमी झाले. ऐन विधानसभा निवडणुकीत शहरात झालेल्या या भीषण हत्याकांडामुळे शहर हादरले. या प्रकरणी तीन संशयित आरोपींनी जळगाव एलसीबीकडे शरणागती पत्करल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

या घटनेत नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (वय ४८),मुलगा प्रेमसागर रवींद्र खरात (वय २८) व गजरे नामक व्यक्ती हे चौघे जण ठार झाले. शहरातील आरपीडीरोडवरील समतानगर भागात रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून खरात परिवारावर हल्ला झाला.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग अर्थात आरपीडी रोडवरील लाल चर्चच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज रात्री उशिरापर्यंत पाहण्याचे काम पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू होते. या प्रकरणात हल्लेखोरांमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे, याची माहिती पोलिस घेत आहेत.

मारेकऱ्यांनी पाठलाग करून खरात कुटुंबीयांवर केला अंदाधुंद गोळीबार हल्लेखोरांनी प्रथम नगरसेवक खरात यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (वय ४८) यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार करत चाकूने सपासप वार केले. त्यामुळे आरडाओरड झाल्यानंतर नगरसेवक रवींद्र खरात त्यांच्या कुटुंबीयांसह घराबाहेर निघाले. त्याचवेळी खरात यांची मुले प्रेमसागर रवींद्र खरात (वय २८), हंसराज उर्फ सोनू रवींद्र खरात (वय ३०) हे दुचाकीने महात्मा गांधी पुतळ्याकडे जीव वाचवण्यासाठी लगबगीने निघाले. हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत होते. रेल्वे हाॅस्पिटल परिसरात हल्लेखोरांनी सिनेस्टाइल पाठलाग करून त्यांच्यावरही अंदाधुंद गोळीबार केला.

नगरसेवक रवींद्र खरात या हल्ल्यात जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी रजनी रवींद्र खरात (वय ४०), मुलगा मयूर खरात (वय २३), हंसराज खरात आणि सूरज सपकाळे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड यांनी आरपीडी रोडवरील लाल चर्च परिसर तसेच खरात यांचे निवासस्थान असलेल्या समतानगरात पाहणी केली. यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनीही भुसावळात घटनास्थळी पाहणी केली. याच दरम्यान जळगाव येथील एलसीबीच्या पथकाने तीन संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींनी शरणागती पत्करल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

गोदावरी हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी शहरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली. तसेच गोदावरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये जखमींना नेल्याची माहिती मिळाल्याने, हॉस्पिटलमध्येही गर्दी उसळली. घटनेनंतर सुनील खरात यांचा मृतदेह घटनास्थळीच होता, तर प्रेमसागर रवींद्र खरात (वय २८), गजरे यांचे मृतदेह मानवतकर हॉस्पिटलमध्ये नेले होते. तर नगरसेवक रवींद्र खरात यांचा मृतदेह जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला होता. रात्री १२.३० वाजेच्या दरम्यान शहरातून तिन्ही मृतदेह जळगाव येथे हलवण्यात आले.

मृतासह तीन जखमी जिल्हा रुग्णालयात; नागरिकांची माेठी गर्दी भुसावळ येथील नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात (वय ४५, रा. भुसावळ) हे जागीच मृत झाले होते. यांच्यासह त्यांच्या मुलगा रीतिक रवींद्र खरात (वय २५, रा. भुसावळ), पत्नी रजनी खरात व अजून एक जखमी अशा तिघांना जळगावातील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात २५० ते ३०० लोकांनी गर्दी केली होती. पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी जिल्हा रुग्णालयाला स्वत: भेट देत जखमी रीतिक खरात याचा जबाब घेतला. या वेळी निलाभ रोहन यांच्यासह जिल्हा रुग्णालयाला पोलिसांचा मोठा गराडा होता. मुलगा रीतिक फाेनवरून घटनेची माहिती इतरांना देत हाेता.

पत्नीने दिला उपचारास नकार मृत रवींद्र बाबुराव खरात यांना जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्या पत्नी रजनी ह्या त्यांच्या मृतदेहाजवळ बसून होत्या. त्यांना देखील डोक्याला मोठी जखम झाली होती. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. त्यांना उपचाराची गरज होती. मात्र, त्या उपचार घेण्यास नकार देत होत्या. त्या आपल्या जखमी मुलाला आपला दुसरा मुलगा कसा आहे? असे सतत विचारत होत्या. मुलगा रीतिकने तो व्यवस्थित असून वडिलांची शपथ देत आईला जखमेवर उपचार करून घेण्यास भाग पाडले.

तीन संशयित शरण गोळीबार प्रकरणानंतर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. चार जणांच्या हत्याकांडानंतर खरात यांचे निवासस्थान असलेल्या समतानगरसह परिसरात संचारबंदी लागू केली. या घटनेप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांकडे शरणागती पत्करली आहे.

जखमींचे घेतले जबाब पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यात जखमींची माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा