औरंगाबाद, ३ जानेवारी २०२३ : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या यांची औरंगाबादमध्ये सोमवारी (ता. दोन) जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती; परंतु या सभेला अजिबात गर्दी नसल्याचे दिसून आले. खुर्च्या रिकाम्याच असल्याने विरोधक खिल्ली उडवीत आहेत.
औरंगाबादमधील सभेत लोकांना संबोधित करताना जे. पी. नड्डा म्हणाले, की ज्यावेळी लस तयारी झाली, ”त्यावेळी हेच काँग्रेस – सपाचे लोक मोदींवर टीका करीत होते. मोदी लस आहे, कोणीही घेऊ नका; मात्र त्याच टीका करणाऱ्यांना मोदींनी लस दिली. जे लोक टीका करीत होते तेच चोरून चोरून मोदींची लस घेऊन आले.” ते पुढे म्हणाले, ”प्रतिकात्मक परिस्थितीत देश सक्षमपणे उभारला. युक्रेन युद्धात कोणत्याही देशांनी आपल्या देशवासीयांना मदत केली नाही; पण मोदींजीनी पुतीन यांना बोलून ३० हजार विद्यार्थ्यांना भारतात आणले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने ‘मिशन १४४’अंतर्गत महाराष्ट्रातल्या १८ लोकसभा लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या विजय संकल्प सभांना सुरवात झाली आहे.
औरंगाबादच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे काही क्षणच बोलल्या. त्यामुळे त्यांच्या मनात खदखद आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. महत्त्वाचे म्हणजे जे. पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमाला लोकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. पंकजा मुंडे यांचे मराठवाड्यात प्रस्थ आहे. त्यांना डावलण्याच्या पक्षाच्या धोरणामुळेच सभेला अल्पप्रतिसाद मिळाल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
दरम्यान, विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नड्डांच्या सभेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ”अहो अध्यक्षजगत प्रकाश नड्डा, जरूर पाहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे.” असे ट्विट दानवे यांनी केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील