विरोधी पक्ष नेते पदावरून भाजपला मोठा धक्का, न्यायालयानं फेटाळली याचिका

मुंबई, २२ सप्टेंबर २०२०: मुंबईत गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना यांची युती होती. मात्र, भाजपनं राजकीय समीकरण बदलत शिवसेना सोबत आपली युती तोडली व विरोधी पक्षाची भूमिका घेतली. यासाठी भाजपनं विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा दावा फेटाळला. याचविरोधात भाजपानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, येथेही भाजपच्या हाती निराशाच आलीय.

कोर्टाच्या या निर्णयामुळं भाजपला मुंबई महानगरपालिकेत चांगलाच झटका बसलाय. शिवसेनेसोबतच्या युतीतून बाहेर पडल्यानंतर भाजपच्या वाट्याला विरोधीपक्ष नेते पद ही आलं नाही त्यात आता कोर्टानंही भाजपच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर भाजपची आता चांगलीच गोची झालीय. न्यायालयानं ही याचिका फेटाळत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब केलाय.

यापूर्वी भाजपकडून नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी आणि गटनेतेपदासाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र, महापौर पेडणेकर यांनी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता नेमला. त्यामुळं दुसरा विरोधी पक्षनेता नेमता येणार नाही असं सांगत त्यांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदावरील दावा फेटाळला. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी मोठा गोंधळही घातला होता. नंतर याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा