बारामती, ६ फेब्रुवरी २०२१: “ही जित्राबं लय वाईट आहे. नेहमी चांगल्या चाललेल्या कामात बिब्बा कालवतात” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या माझा हक्क माझा व्यवसाय कार्यक्रमाच्या शुभारंभात विरोधकांवर टीका केली होती. यावर आज भाजप व राष्ट्रीय समाज पक्षाने पवार यांच्या गावाला अोवाळून सोडलेल्या वळूपेक्षा जित्राबं बरी, या शब्दात भाजपने खडे बोल सुनावले.
भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. नितीन भामे व राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीला दिले. अॅड. भामे म्हणाले, “अजितदादा होय, आम्ही जित्राबंच आहोत. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात काबाडकष्ट करणारी जित्राबच असतात. शेतकरी त्यांना जीवापाड जपतात. मात्र, गावात पोसलेल्या आणि अोवाळून सोडलेल्या वळूपेक्षा जित्राबं बरी असतात.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आताचे आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. हे जनतेला पेटवून देण्यासाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आरपारची लढाई करणार आहे, असे भामे म्हणाले. तर रासपचे अॅड. सातकर म्हणाले, “नागरिकांच्या हितासाठी जलसंपदा विभागाला निवेदन दिले. कालव्याच्या अस्तरीकरणामुळे विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी पडणार आहे. शहराच्या विकासकामांना आमचा विरोध नाही. तरीही तुम्ही जित्राबाची उपमा देता. तुमच्या पक्षाचे बारामतीतील लोक गोरगरीबांच्या मुंड्या मुरगाळून सावकारी करतात, ते तुम्हाला कसे चालते,” असा सवाल सातकर यांनी यावेळी केला.
न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव