पुणे, २ मार्च २०२३ : पुणे जिल्ह्यातील कसबापेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांत पार पडलेल्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज पार पडली आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप विजयी झाल्या आहेत.
कसबापेठ आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे भाजपचे विद्यमान आमदार होते. दरम्यान, यादोन्ही आमदारांच्या अकाली निधनामुळे या ठिकणी पोटनिवडणूक लागली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले. तर काही करून हा मतदारसंघ खेचून घ्यायचाच, यासाठी महाविकास आघाडीने पूर्ण प्रयत्न केले आणि विजय मिळविलाच.
कसब्यात मतमोजणीला सुरवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली. विशेष बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडले आहे. रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार ४० मताधिक्य घेऊन विजय मिळविला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केले आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्ता असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. शिवाय शिंदे गटाचा आणि मनसेचा पाठिंबा असतानाही भाजपला ही सीट राखता आलेली नाही.
चिंचवडबद्दल बोलायचे तर दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी माविआमध्ये फूट पडली नसती तर त्यांना सहानुभूतीचा लाभ मिळाला नसता. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे उभे राहिले नसते आणि महाविकास आघाडीच्या मतांना फटका बसला नसता, तर चिंचवडच्या जागेवरही भाजपसाठी धोक्याची घंटा वाजली असती. नाना काटे यांच्या २८४२१ मतांमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची ११४२६ मते जोडली तर ती भाजपच्या अश्विनी जगताप यांच्या ३५९३५ मतांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती; मात्र तसे होऊ शकले नाही आणि महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला चिंचवडची जागा सोडण्याची संधी मिळाली.
अशा स्थितीत २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपसाठी तणावाची बाब आहे. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे भाजपशी लढणार असेल, तर भाजपचा मार्ग सोपा नसेल.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे