दिल्ली, २८ जुलै, २०२२ : द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारला. पण आता या राष्ट्रपती नावावरुन लोकसभेत गदारोळ उडाला. काँग्रेसचे अधिररंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींच्या ऐवजी राष्ट्रपत्नी असं संबोधून एका वादाला निमंत्रण दिलं आहे.
वास्तविक राष्ट्रपती या पदावर कोणी महिला असो वा पुरुष, या पदावरील व्यक्तीला राष्ट्रपती म्हणूनच संबोधावे लागते. मात्र अधिर रंजन यांच्या तोंडून दोन वेळा राष्ट्रपत्नी असे उच्चारले गेले. यावरुन लोकसभेत भाजप आक्रमक झाली. त्यांनी सोनिया गांधींनी यावर माफी मागावी, यासठी आग्रह धरला. यावेळी स्मृती इराणी, निर्माला सीतारामन आक्रमक झाले होते.
पण यावर अधिररंजन यांनी मात्र भाजपलाच जबाबदार धरलं आहे. माझ्याकडून झाली चूक, तर मला काय आता फाशी देणार का? असा सवालही त्यांनी विचारला. त्याचबरोबर भाजप मुद्दाम माझे लक्ष विचलीत करत आहे. असा उलटा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. मी राष्ट्रपतींचा कधीच अपमान करु शकत नाही. त्यामुळे मी मुद्दाम राष्ट्रपत्नी असा शब्द वापरला, असं होणार नाही.
मला तर असं वाटतं की भाजपने मुद्दाम माझे लक्ष विचलीत करुन हा मुद्दा उपस्थित केला, ज्यामुळे महागाई, अग्निपथ योजना यांसारख्या प्रमुख मुद्दयांवर चर्चा टाळता येईल, हेच भाजपचे लक्ष असल्याचे अधिर रंजन यांनी नमूद केलं, पण यात अधिर रंजन यांनी उपरोधिकपणे बोलण्याने भाजपला अधिक वाव मिळाला आणि त्यामुळे भाजप आक्रमक झाली. त्यामुळे लोकसभेतील आजच्या दिवसाची सकाळ चांगलीच गाजली, असंच म्हणावे लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस













































