भाजपला मोठा धक्का, अकाली दलनं शेती विधेयकाच्या निषेधार्थ तोडली युती

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२०: मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकाबाबत देशभरात निदर्शनं होतायत. विरोधी पक्षही शेतकर्‍यांसोबत आंदोलन करीत आहेत, तर शिरोमणी अकाली दलाच्या भारतीय जनता पक्षाच्या २२ वर्षांच्या युतीतील भागीदारीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कृषी विधेयकाचा निषेध म्हणून शिरोमणी अकाली दलानं राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सह २२ वर्ष जुने संबंध तोडण्याची घोषणा केलीय.

शिरोमणी अकाली दल बराच काळ मोदी सरकारच्या माध्यमातून आणलेल्या कृषी विधेयकाला विरोध करत आहे. निषेधामुळं अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा आधीच सादर केला होता. मात्र, त्यानंतर अकाली दलानं एनडीए सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली. पण, आता अकाली दलानं कृषी विधेयकाच्या निषेधार्थ एनडीएबरोबर आपली युती तोडण्याचा निर्णय घेतलाय.

अकाली दलानं असं म्हटलं आहे की, केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे विपणन सुनिश्चित करण्याच्या एमएसपी’च्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी वैधानिक कायदेशीर हमी देण्यास नकार दिला. यामुळं भाजपाप्रणित एनडीए युती तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पंजाबी आणि शीख समुदायाशी संबंधित मुद्द्यांबाबत केंद्र सरकारच्या असंवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी पक्षाच्या कोर समितीच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत एनडीएपासून वेगळं होण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सुखबीरसिंग बादल म्हणाले होते की, अकाली दलाच्या धक्क्यानं (हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा) मोदी सरकारला हादरवलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकर्‍यांवर कोणताही शब्द नव्हता, परंतु आता यावर ५-५ मंत्री बोलत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा