इंदापूर, १ फेब्रुवरी २०२१: इंदापूर येथे महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सोमवार (दि.१) भाजपा व मित्र पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी सरकारला दिला.
भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कार्यालयासमोर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज तोडणी मोहीम थांबवावी, या मागणीसाठी भाजप व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
महाआघाडीचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. जर वीज कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचा कर्मचारी आला तर त्यांना गुलाबाचे फुल देऊन माघारी पाठवा,असे आवाहन भाषणात मयूरसिंह पाटील यांनी केले.
भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार म्हणाले, “हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज याठिकाणी भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या विरोधात हे आंदोलन असून जर महावितरणने वीज तोडणी मोहीम थांबली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल. तालुक्याचे निष्क्रिय लोकप्रतिनिधी सायरन वाजवत तालुक्यात फिरतात. राज्यमंत्र्यांनी तालुक्यातील वीज कनेक्शनची तोडणी व सक्तीची वसुली बंद करावी,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे निलेश देवकर, रिपब्लिकन पार्टीचे शिवाजी मखरे, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. कृष्णाजी यादव, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सचिव तानाजी थोरात, भाजपा किसान मोर्चाचे माऊली चवरे, पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, युवराज मस्के यांची भाषणे झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे