वीज बिल दरवाढ रद्द करण्यासाठी भाजपाचे ठाणे शहरात आंदोलन

ठाणे, दि. १ जुलै २०२०: सरकारने केलेल्या वीज दरवाढीविरोधात आज ठाण्यामध्ये भाजपने विरोध दर्शवला. सदर वीज दरवाढ कमी करण्याबाबत भाजपच्या वतीने आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच शहराच्या विविध भागात कार्यकर्ते व नागरिकांनी मागणी केली.

भाजपाचे शहर युनिटचे अध्यक्ष व एमएलसी निरंजन डावखरे, ठाणे आमदार संजय केळकर आणि पक्षाचे प्रदेश महिला अध्यक्षा माधवी नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. बॅनर व फलक लावून आंदोलनकर्त्यांनी बिलांवरून वीज कंपन्यांविरोधात घोषणाबाजी केली. डावखरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले.

पत्रकारांशी बोलताना डावखरे म्हणाले की, ठाणे शहरात महावितरण कंपनी व कळवा, मुंब्रा, शिळ परिसरात टोरेंट पॉवर कंपनीकडून वीजपुरवठा केला जातो. परंतु, लॉकडाउनच्या काळातच महावितरण कंपनी व टोरेंटने १ एप्रिलपासून स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकारामध्ये दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला.

जूनमध्ये अचानक किमान दोन हजार ते ५० हजारांपर्यंत बिले ग्राहकांपर्यंत धाडण्यात आली. तर व्यापारी व उद्योग क्षेत्राबरोबरच शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र, त्यांनाही सरासरी बिले आकारल्यामुळे महावितरण व टोरेंट पॉवरचा `महंमद तुघलकी’ कारभार उघड झाला आहे, अशी टीका जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा