मुंबई, १४ ऑक्टोबर २०२२ : शिंदे गट अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही आणि भाजपने आता हा वाद मिटवला आहे. मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाकडे जाणार नसून भाजप येथूनच लढणार आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे.
गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाली. दोन्ही पक्षांनी ही जागा भाजपसाठी सोडण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुरजी पटेल यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची सूचना केली. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटापेक्षा भाजपची सत्ता जास्त असल्याने या जागेसाठी भाजपने जोर धरला होता. मुरजी पटेल यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र या जागेवर शिंदे गटाचाही दावा होता.
उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांचे नाव फायनल केले असून त्या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी महापालिका (BMC) सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र पालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यानंतर न्यायालयाने बीएमसीला ऋतुजा यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात सुमारे १ लाख ४७ हजार ११७ मतदान झाले होते. यामध्ये रमेश लटके यांना ६२ हजार ७७३ मते मिळाली. मुरजी पटेल यांना ४५ हजार ८०८ मते मिळाली. २०२० मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड