पक्षिविश्व- कापशी घार (black-winged kite)

कापशी म्हणजे कापसा सारखी पांढरी शुभ्र दिसणारी. आणि काळ्या पंखाची म्हणून इंग्रजी मध्ये ह्या घारीला black-winged kite असं म्हणतात. कापशी ह्या पक्ष्याच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे हा पक्षी घार कुटुंबात गणला जातो. हा पक्षी गुबगुबीत दिसतो आणि दिसायला देखणा व दिमाखदार असतो. ह्या पक्ष्याचे पोट डोकं वगैरे पांढराशुभ्र कापसासारख दिसतं आणि इतरत्र राखाडी रंग असून खांद्यावरचा व पंखाचा रंग गडद काळा असतो. ह्या पक्ष्याचे डोळे लालभडक असतात. डोळ्यांच्या भवती काळा भाग असतो. ह्या पक्ष्याची मादी एका वेळी ३-४ अंडी देते व साधारण २५ दिवस उबवते. मादी आपला पूर्णवेळ घरटे व पिलांसाठी देते तर नर पिल्लांना व मादीला अन्न पुरवण्याचे काम करतो . विणीच्या हंगामात ह्या पक्ष्याला कंठ फुटतो. उडताना ची ची ची आवाज करतात.

ह्या पक्ष्याचे प्रमुख अन्न म्हणजे लहान उंदीर, सरडे, छोटे साप आणि इतर कीटक आहेत. काळी बाकदार चोच ही शिकारी पक्ष्याला साजेशी अशीच असते जी सावज धरायला आणि फाडायला मदतीची असते. आकाशात एकाच जागी स्थिर घिरट्या घालत तो शिकार करतो. ह्या पक्ष्याचे नर आणि मादी ह्यात कमालीचे साम्य असते. ह्या पक्ष्याच्या चेहऱ्याची ठेवण ही बऱ्याचदा घुबडासारखी असल्याने आपल्याला थोडी गोंधळात टाकते. हा पक्षी फारसा स्थलांतर करत नाही आणि शक्यतो मैदानी अथवा खुरट्या झुडुपांच्या प्रदेशात आढळतो.

कापशी घार हा मध्यम शुष्क प्रदेशांत आढळणारा दिनचर शिकारी पक्षी आहे. याला मराठीमध्ये चचान किंवा पांजरा म्हणूनही ओळखतात. या पक्ष्याच्या काळ्या पंखांमुळे माळरानावर याला सहजपणे ओळखता येते. आकाराने कावळ्यापेक्षा लहान असणारा हा पक्षी उडताना हॉवरिंग करतो, म्हणजे एकाच ठिकाणी भक्ष्यावर नजर ठेवून स्थिर स्थितीत पंख फडफडवत असतो. त्यावेळी त्याच्या खांद्यावरील काळे डाग ठळक दिसतात. मिटलेल्या पंखाची टोके शेपटीपेक्षा लांब दिसतात. एखाद्या फांदीवर बसून वाऱ्याच्या झोक्यासोबत हलणारी कापशी घार खुपच निरागस सुंदर दिसते.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा