“आम्हाला दिसत नाही, पण आमचं ध्येय स्पष्ट दिसतं.” हे वाक्य सिद्ध करत पिंपरीतील माई बालभवन संस्थेतील चार अंध मुलींनी जागतिक स्तरावर ‘नेत्रदीपक’ कामगिरी केली आहे. कोमल गायकवाड, दीपाली कांबळे, हर्षदा काळभोर आणि स्वाती माने या जिद्दी मुलींची आगामी जागतिक अंध महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या मुलींनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर संस्थेचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.
अंध व्यक्ती फुटबॉल खेळू शकत नाहीत, हा गैरसमज मोडीत काढत या खेळाडूंनी मैदानावर आपली प्रतिभा दाखवली. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या प्रशिक्षक विक्रम सिंग, मार्गदर्शक रुचिरा इंगळे आणि माई बालभवनचे संचालक मधुकर इंगळे यांना जाते. या खेळासाठी दृष्टीऐवजी आवाजावर अधिक अवलंबून राहावे लागते. या खेळात बॉलमध्ये आवाज असतो. खेळाडू ‘वाय’ हा स्पॅनिश शब्द सात सेकंदांनी उच्चारून आपल्या जागेची माहिती देतात.
बॉलचा आवाज, गोलगाईडचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर या मुलींनी मैदानावर अद्भुत खेळ दाखवला.
या खेळाडूंपैकी एक असलेल्या दीपाली कांबळेने सांगितले की, “अंध खेळू शकत नाहीत हा गैरसमज आम्ही आमच्या खेळातून मोडीत काढला आहे.” तर कोमल गायकवाड म्हणाली, “बॉलचा आवाज ऐकल्यावर आमची जिद्द दुप्पट होते.”
माई बालभवनचे संचालक मधुकर इंगळे यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, “या मुलींचे यश हे अनेकांसाठी प्रेरणेचा झरा आहे. पॅराऑलिम्पिकसाठी आणि जागतिक स्तरावर आणखी खेळाडू देण्यास आम्ही सज्ज आहोत.”
या मुलींनी दाखवून दिले आहे की, कोणत्याही परिस्थितीत ध्येय निश्चित असेल तर कोणतीही अडचण अडथळा आणू शकत नाही. त्यांच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































