भोकरदन, २३ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्रातील करोडो मराठ्यांना दिलेला सगेसोयरे हा आध्यादेश सरकारने तात्काळ काढावा व समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी जरांगे पाटलांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उद्यापासुन दररोज रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने भोकरदन येथे सकल मराठा समाजाची बैठक संपन्न होऊन शहरासह तालुक्यातील मराठा सेवकांच्या उपस्थितीत भव्य रास्ता रोको आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकाळी ११ ते १ यावेळेत करण्याचे ठरवण्यात आले आहे. या आंदोलनात तालुक्यातील प्रत्येक गावातील समाजबांधव सहभागी होणार असून या रास्तारोको आंदोलनाचे निवेदन आज भोकरदन पोलीस स्टेशनचे स. पोलीस निरिक्षक बालाजी वैद्य यांना मराठा सेवकांच्या वतीने देण्यात आले.
शिवाय भोकरदन तालुक्यातील समाजबांधवांना आगामी आंदोलने, बैठका व कुणबी प्रमाणपत्राविषयी माहीती व्हावी यासाठी मदतकक्षाची स्थापना छत्रपती चौकात गजानन मार्केट या ठिकाणी करण्यात आली असून मराठासेवकांच्या हस्ते या मदतकक्ष कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजबांधव आणि मराठा सेवकांची उपस्थिती होती.
न्यूज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे