बीएमसी कोविड सेंटर घोटाळा, औषधे स्वस्तात उपलब्ध असतांना तिप्पट किमतीत विकत घेतली

मुंबई २३ जून २०२३: मुंबईतील बीएमसी कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत. मृतदेह सील करण्यासाठी खरेदी केलेल्या पिशव्यामध्ये, बीएमसीने मोठा घोटाळा केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ज्या कंपनीने बॉडी सील करण्यासाठी या पिशव्या बाजारात २,००० रुपये दराने विकल्या, त्याच पिशव्या बीएमसीने ६,८०० रुपये दराने खरेदी केली.

आरोपानुसार, तत्कालीन महापौरांच्या शिफारशीवरून या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले होते. कोविडच्या उपचारात वापरण्यात येणारी औषधे बीएमसीकडे उपलब्ध असलेल्या दरापेक्षा २५-३० टक्के कमी दराने बाजारात उपलब्ध होती, ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतरही बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. बीएमसीला दिलेल्या बिलात दाखविलेल्या डॉक्टरांच्या तुलनेत, लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये ६०-६५ टक्के कमी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होते.

माहितीनुसार, आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे ७० कोटींची रोकड, १५० कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे ५० स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राशी संबंधित कागदपत्रे, सुमारे १५ कोटी रुपयांची एफडी/गुंतवणुकीची कागदपत्रे, सुमारे २.५ कोटींचे दागिने याशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहत.

लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडे शिवाजीनगर, पुणे येथील जंबो कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा आणि कर्मचारी पुरविण्याचे काम सोपविण्यात आले होते. मात्र या केंद्रात पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर पुणे पालिकेने समिती नेमली आणि तपासणीत या कंपनीला वैद्यकीय सेवा देण्याचा पूर्वीचा अनुभव नसल्याचे आढळून आले, त्यामुळे समितीने कंपनीचे कंत्राट रद्द केले. असे असतानाही मुंबईतील बीएमसीने या कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा