बाजार समितीला मिळेना निवडलेले संचालक मंडळ.. ! गैरकारभाराचे आरोप पण कारवाई नाही..!

उरुळी कांचन, दि. १४ ऑगस्ट २०२०: कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या संस्थेच्या १९९९ ते २००३ या कालावधीत ज्या संचालक आणि गैरकारभार करून कोट्यवधी रुपयांना समितीला पर्यायाने शेतकऱ्याला खड्ड्यात घातले, त्या संचालकावर आरोप निश्‍चित होऊ नये. अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

ही कारवाई तातडीने व्हावी, अशी मागणी शिंदेवाडी ता. हवेली येथील शेतकरी व नैसर्गिक शेती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जगताप, यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे केली आहे. लेखी निवेदनात म्हटले आहे की या गैरकारभाराच्या मे. मुलाणी आणि कंपनी या अधिकृत फर्मने तपास केला. त्याचा अहवाल पण संचालकांना सादर केला.

त्याला अनुसरून तत्कालीन जिल्हा उपनिबंधक पुणे संजय भोसले यांनी तत्कालीन संचालक मंडळावर आरोप निश्चित करून वसुलीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते, पण या संचालकांनी न्यायालयात सहकारमंत्री यांच्याकडे जात आजपर्यंत या कारवाईला थांबविले आहे. दोषी संचालकवरील कारवाईला तात्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढील सुनावणी पर्यंत दिलेल्या स्थगिती विद्यमान सहकार व पणन मंत्री यांनी तातडीने उठवावी व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रभाकर जगताप यांनी केली आहे.

सन १९९९ ते २००३ मध्ये या समितीवर कार्यरत असलेले संचालक मंडळाच्या गैरकारभाराला आणि समितीला सुमारे सात ते आठ कोटी रुपये गेल्याने चौकशीअंती संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासकाची नेमणूक केली गेली त्यानंतर आतापर्यंत त्यावर प्रशासक सरकार नियुक्त प्रशासक मंडळ सरकार नियुक्त संचालक मंडळ व पुन्हा प्रशासकाचा जवळपास पंधरा वर्षांचा कालावधी लोटला पण लोकशाही मार्गाने निवडलेले संचालक मंडळ या संस्थेला काही मिळेना मग सत्ता कोणाची असो अशी खंत प्रभाकर जगताप यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

प्रशासन हटवून तेथे शासन नियुक्त प्रशासक मंडळ आणून त्यावर आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांची वर्णी लावण्याची धडपड सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील सहभागी नेते कार्यकर्ते करीत आहेत त्यासाठी प्रशासनाचा कारभार भ्रष्टाचारी असल्याची आवई उठवून तवा तापवून त्यावर आपली पोळी भाजून मनसोक्त ताव मारायचा असा प्रकार सध्या चालू आहे. तोच थांबला पाहिजे प्रशासक पाठवायचा असेल तर उच्च न्यायालयाच्या निकाला प्रमाणे तातडीने संचालक मंडळाची निवडणूक घेऊन त्यावर लोकशाही मार्गाने संचालक मंडळ बसवायचे अशी मागणी या संदर्भात पूर्व हवेलीतील शेतकरी व व्यापारी करीत आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा