सिंहगड किल्ल्यावर आढळला बेपत्ता मजुराचा मृतदेह

पुणे २८ फेब्रुवारी २०२६: सिंहगड किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधिस्थळावर ठेकदाराकडे काम करणाऱ्या मजुराचा मृतदेह काल सायंकाळच्या सुमारास किल्ल्यावरील कल्याण दरवाजाच्या दरीत आढळल्याने खळबळ उडाली.

दशरथ शंकर धोत्रे असं ह्या मजूराच नाव आहे. ते मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी होते. मयत धोत्रे हे चार दिवसांपूर्वीच सिंहगड किल्ल्यावर कामासाठी आले होते. ते त्यांच्या इतर ४-५ साथीदारांसमवेत सिंहगड किल्ल्यावरील तानाजी मालुसरे समाधी परिसरातील पुरातत्व विभागाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे काम करीत होते. हे सर्वजण सिंहगड किल्ल्यावरच वास्तव्यास होते.

दशरथ धोत्रे हे बुधवारी मध्यरात्रीपासून गायब होते. त्यांच्या सहकाऱ्यांना वाटले की, ते गावाकडे निघून गेले असतील. दिवसभर त्यांचा फोनही झाला नाही. मात्र, इकडे कल्याण दरवाजा परिसरात सायंकाळच्या सुमारास पर्यटकांना मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापनाचे तानाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गडावर धाव घेत दरीतून मृतदेह बाहेर काढत, स्थानिक राजगड पोलिसांच्याकडे सुपूर्त केला. या प्रकरणाचा राजगड पोलिस अधिक तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनीधी: पूजा मालुसरे