‘आमदार’ या पदाचा गैरवापर करून ‘बोगस व्हीआयपी संस्कृती’ पिंपरी-चिंचवडमध्ये फोफावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरात प्रत्यक्षात केवळ पाच आमदार असताना, त्यांच्या नावाने शेकडो गाड्यांवर ‘आमदार’ असे स्टिकर लावून रुबाब मिरवला जात आहे. यामुळे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून, सामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
विधानसभेसाठी हिरव्या आणि विधानपरिषदेसाठी लाल रंगाचे अधिकृत स्टिकर मिळवून अनेक नातेवाईक, समर्थक आणि कार्यकर्ते त्यांचा गैरवापर करत आहेत. एवढेच नाही, तर काही गाड्यांवर बेकायदेशीरपणे निळे-लाल फ्लॅशर आणि पोलिसांसारखे सायरनही बसवलेले आढळले आहेत. गर्दीतून लवकर बाहेर पडण्यासाठी किंवा सिग्नल तोडण्यासाठी अशा वाहनांचा सर्रास वापर केला जात आहे.
या बोगसगिरीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, पोलिसही अशा गाड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, ज्यामुळे या गैरप्रकाराला आणखी बळ मिळते. या समस्येवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बनावट स्टिकर काढून टाकणे आणि बेकायदेशीर फ्लॅशर व सायरन बसवणाऱ्यांवर दंड ठोठावणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या वाढत्या ‘बोगसगिरी’मुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































