डेहराडून, ३१ डिसेंबर २०२२ : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. तर सध्या तो डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला रिकव्हर होण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच प्रार्थना करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी कळताच त्याचा आईशी संवाद साधला. त्यांना धीर दिला व ऋषभच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेते अनुपम खेर यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन ऋषभची आणि त्याच्या परिवाराची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दोघांनीही सर्व चाहत्यांना ऋषभसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.
दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा ऋषभ पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले असताना त्यांनी ऋषभशी संवाद साधला.खड्ड्यांपासून वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे ऋषभने मला सांगितले, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर पुढे बोलताना ते म्हणाले, ‘तो स्थिर आहे आणि बरा होत आहे. आमचे ‘बीसीसीआय’चे डॉक्टर इथल्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. आता तरी तो इथेच ॲडमिट राहणार आहे. ‘
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे