बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा बनली आई, सरोगसीद्वारे बाळाचा जन्म

पुणे, 22 जानेवारी 2022: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई झालीय. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. बाळाचा जन्म सरोगसीद्वारे झाला. प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केलं. प्रियांका चोप्राने 2000 साली मिस वर्ल्डचा किताबही जिंकला होता.

सोशल मीडियावर माहिती देताना प्रियांका चोप्रा म्हणाली, ‘आम्ही सरोगसीच्या माध्यमातून मुलाचे स्वागत करत आहोत, हे सांगताना आनंद होत आहे. आम्ही आदरपूर्वक सांगू इच्छितो की या विशेष काळात आमच्या गोपनीयतेची काळजी घेत असताना, आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. धन्यवाद’

2018 मध्ये राजस्थानमध्ये पारंपारिक पद्धतीनं निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर, प्रियांका चोप्रा आपल्या पतीसोबत बहुतेक वेळ अमेरिकेत राहते.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत खणकावलं नाणं

प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एकेकाळी चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिच्या चमकदार अभिनयासाठी तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

2016 मध्ये, भारत सरकारने प्रियांका चोप्राला पद्मश्री देऊन सन्मानित केलं आणि टाइम मासिकाने तिला जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून घोषित केलं. फोर्ब्सने तिला जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीतही स्थान दिलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा