मुंबई, ८ जानेवारी २०२३ : भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर दहशतवाद्यांच्या नेहमीच टार्गेटवर राहिलं आहे. याच मुंबई शहरात येत्या दोन महिन्यात १९९३ सारखा स्फोट होणार असा फोन पोलीस कंट्रोलला करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना सूत्र फिरवत फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये काल एक निनावी फोन आला होता. फोन करणाऱ्याने पुढच्या दोन महिन्यांतच मुंबईत १९९३ सारखे स्फोट होणार असल्याचा दावा केला. मुंबईच्या माहिम, भेंडीबाजार, मदनपुरा आणि नागपाडामध्ये बॉम्बस्फोट होणार असून यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचेही धमकी देणाऱ्याने सांगितले होते. त्याचप्रमाणे १९९३ साली मुंबईत दंगल उसळली होती. तशीच दंगल आताही होणार असल्याचेही या फोनवरुन सांगण्यात आले होते.
दरम्यान, मुंबई एटीएसने तपास करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.