नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादावरून पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उद्या दिल्लीवारी करणार आहेत.
दरम्यान, मागच्या चार दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील ४० गावे आमच्याकडे येणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. यावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. असे असताना बोम्मई हे अनेक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत.
याबाबत माहिती देताना बसवराज बोम्मई यांनी सोमवारी सांगितले की, उद्या मी दिल्लीला जात आहे. तिथे मी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहे. त्यांनी मला भेटीसाठी अद्याप वेळ दिलेली नाही. मात्र आमची भेट होईल, याची मला खात्री आहे.
पुढे ते म्हणाले, त्यानंतर मी मुकूल रोहतगी यांनादेखील भेटणार आहे. या भेटीत मी त्यांच्याशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर चर्चा करणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची देखील भेट घेणार आहे.
- मंत्रिमंडळ विस्ताराचा मोठा दबाव
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रचंड दबाव आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काही नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात यावे अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. मंत्रिमंडळात सहा पदे रिक्त आहेत, ती भरण्याबरोबरच काही मंत्र्यांचा पत्ता कट करत, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.