पुरंदर, दि. २८ जून २०२० : चीन एका बाजूने आपल्या प्रदेशावर आक्रमण करतो, तर दुसऱ्या बाजूने आपण चीनच्या वस्तू खरेदी करून चीनला एक प्रकारे मदत करतो. म्हणून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे हीच खरी सीमेवर शहीद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली ठरेल. चिनी वस्तू वरील बहिष्काराला आंदोलनाचे स्वरूप द्यायला हवे.असे मत पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले आहे.
पुरंदर काँग्रेस कमिटीच्यावतीने काल संध्याकाळी सासवड मध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पुरंदरमधील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. येथील तरुणांनी शहीद जवानांच्या प्रतिमा असलेला बोर्ड हातात घेऊन त्यांना अभिवादन केले व चीनचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना संजय जगताप म्हणाले की, सरकारने कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता सीमेवर जे काय घडते ते देशवासीयांना सांगायला हवे. संकटाच्या काळात आपण सर्वजण केंद्र सरकारच्या पाठीशी उभे आहोत. मात्र सरकार सीमेवर काय चाललंय याची खरी माहिती देताना दिसून येत नाही. आज चीन बरोबर लढत असताना आपण चिनी वस्तूंचा बहिष्कार करायला हवा. चिनी वस्तू खरेदी करू नका असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांत वेगवेगळ्या ठिकाणी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे