Bihar Public Service Commission: बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) 70व्या संयुक्त स्पर्धा परीक्षा 2025 मध्ये कथित पेपर गळती झाल्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी तातडीने सुनावणीची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वतीने सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासमोर ही बाब तातडीने मांडण्यात आली. वकीलांनी न्यायालयात सांगितले की, “माय लॉर्ड्स, ही याचिका बीपीएससीच्या विद्यार्थ्यांची आहे, जे पेपर गळतीमुळे प्रभावित झाले आहेत. त्यांची परीक्षा २४ एप्रिल रोजी आहे.”त्यावर सरन्यायाधीशांनी उत्तर दिले की, मेंशनिंग नोट आल्यानंतरच या प्रकरणाची सुनावणीसाठी यादीत नोंद केली जाईल.दरम्यान, बीपीएससीच्या ७०व्या मुख्य परीक्षा २५ एप्रिलपासून सुरू होणार असून ती ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालणार आहे.
पूर्वीची याचिका टाकली होती फेटाळून-
जानेवारी महिन्यात सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने बीपीएससीच्या ७०व्या संयुक्त स्पर्धा परीक्षेच्या (पूर्व परीक्षा) रद्दबाबत दाखल याचिका फेटाळून लावली होती. ही याचिका देखील पेपर गळतीच्या आरोपांवर आधारित होती.
काय आहे प्रकरण?
१३ डिसेंबर २०२४ रोजी राज्यभरातील ९०० परीक्षा केंद्रांवर सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांनी बीपीएससीची ७०वी पूर्व परीक्षा दिली होती. या परीक्षेनंतर पेपर गळतीचे आरोप समोर आले आणि त्याविरोधात जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी २ जानेवारीपासून अमरण उपोषण सुरू केले.
प्रशांत किशोर यांच्यासह विद्यार्थ्यांनी संपूर्ण परीक्षा रद्द करून नव्याने घेण्याची मागणी केली. मात्र बीपीएससीने केवळ ‘बापू परीक्षा परिसर’ या केंद्रावर परीक्षा दिलेल्या १०,००० विद्यार्थ्यांसाठीच फेरपरीक्षेची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,राजश्री भोसले