‘ब्रह्मास्त्र’ रिलीज झाल्यानंतर ३ तासात लीक, १८ वेबसाइट ब्लॉक केल्यानंतरही पायरसी थांबेना

मुंबई, १० सप्टेंबर २०२२: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र चित्रपट शुक्रवारी, ९ सप्टेंबर ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ‘ब्रह्मास्त्र’ हा बॉलीवूड चित्रपटांमध्ये सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची २८.५ कोटींची अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाली होती. परंतु प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ३ तासांनी ब्रह्मास्त्र ऑनलाईन लीक झाला आहे. ४१० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अनेक पायरसी साइट्सवर एचडी क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे.

रिपोर्ट्सनुसार ‘ब्रह्मास्त्र’ची एचडी प्रिंट TamilRockers, Movierulz, Filmyzilla, 123Movies, Torrent आणि Telegram सारख्या साइटवर लीक झाली आहे. मोठ्या प्रमाणात अ‍ॅडव्हान्स बुकिंग असूनही, चित्रपटाच्या लीकचा बॉक्स-ऑफिस कलेक्शन वर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी ऑनलाइन पायरसी साइट्सविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अशा १८ वेबसाइट्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. असे असूनही ब्रह्मास्त्र एचडी मध्ये लीक झाला.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला सर्वत्र संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अयान मुखर्जीचा दिगदर्शीत हा चित्रपट रिलीज होण्याआधीच चर्चेत होता. बहिष्काराचा ट्रेंड आणि संमिश्र रिव्ह्यूज नंतरही अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये तेजी होती. पायरसी नंतरची वाटचाल ब्रह्मास्त्र साठी कठीण असणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा