नागपूर, ८ ऑगस्ट २०२३ : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला दिल्याप्रकरणी एटीएसने निशांत अग्रवालला अटक केली होती. २०१८ मध्ये अटक केल्यानंतर गेल्या वर्षीच त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. नंतर दाखल केलेला जामीन अर्ज ग्राह्य धरून दिलासा मिळाला असला, तरी जामीन फेटाळताना उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला हे प्रकरण ६ महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश दिले होते.
आता मुदत वाढवून देण्याची विनंती करत जिल्हा न्यायाधीश आणि सत्र न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाला पत्र पाठवले असून, त्याची दखल घेत न्यायाधीश उर्मिला जोशी-फाळके यांनी याचिका फेटाळून ६ महिन्यांत खटला निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील आय.जे.दामले यांनी काम पाहिले. ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा अभियंता फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकला होता.
जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाला पाठवलेल्या पत्रात आतापर्यंत ११ सरकारी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले. याशिवाय इन्स्पेक्टर दिनेश कुमार शर्मा आणि हेड कॉन्स्टेबल महेश सिंग यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी खटल्याची सुनावणी ठेवण्यात आली आहे. या न्यायालयात UAPA, NI कायदा, ACB प्रकरणांचीही सुनावणी आहे. जुन्या प्रकरणांची बरीच सुनावणी प्रलंबित असल्याने उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या मुदतीत प्रकरणाचा निपटारा करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक वर्षाची मुदत वाढवून देण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड