पुरंदर, दि.१० ऑगस्ट २०२०: दि. १० ऑगस्ट १६४८ रोजी किल्ले पुरंदर येथे झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईतील ऐतिहासीक विजयाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी आज सासवड येथे ३७२ वा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या पुतळ्यास आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी कर्नाटक बेळगाव जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या प्रकरणी याच्या निषेधार्थ पुरंदरच्या तहसीलदार यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.
स्वराज्यावर चाल करून आलेला फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला होता. त्यावेळी गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली होती. याच वेळी बाजी पासलकर यांना वीर मरण आलं. त्यामुळे चवताळून गोदाजीराजे जगताप यांनी फत्तेखानाचा सरदार मुसेखान याला गाठून आपल्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला होता. गोदाजीराजेंचा रौद्र पराक्रम पाहून फत्तेखान घाबरून विजापूरला पळून गेला आणि मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला. हा असा इतिहास आहे. महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी १० ऑगस्टला सासवड येथे शौर्य दिन उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे मर्यादित संख्येत शौर्य दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अजयकुमार जगताप, रोशन जगताप, नंदकुमार जगताप, गणेश जगताप, अनिल जगताप, रमेश जगताप, मराठा महासंघाचे उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, अध्यक्ष दीपक जगताप, संतोष जगताप, विजय जगताप, सागर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे