दोन महिन्यानंतर नीरा नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला

बारामती, दि.८ जुन २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यालगत असणाऱ्या फलटण तालुक्यात जाणारा निरा नदीवरील मेखळीचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. हा पूल दोन महिन्यानंतर अत्यावश्यक वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

मेखळीतील पूल बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व प्रशासनाच्या आदेशानुसार मेखळी ग्रामपंचायतीने वाहतुकीसाठी खुला केला आहे.फलटण तालुक्यातील पूर्व भागातील सुमारे ३५ ते ४० गावातील हजरो लोकांना याचा फायदा होणार आहे.येथील लोकांचे सर्व व्यवहार हे बारामती येथे आहेत. बारामती येथे शेतीसाठी लागणारी रासायनिक खते, औषधे आदींसह अन्य शेती उपयोगीसाठी अवजारांचे विविध स्पेअर पार्ट मिळतात.ते आणण्यासाठी मेखळीच्या पुलाचाच मोठ्या प्रमाणात वापर होतो.

मेखळीतील पूल बंद असताना या भागातील लोकांना सांगवी येथील पुलावरून बारामती येथे जावे लागत होते. बारामती येथे फलटण तालुक्यातील अनेक युवक रोजगारासाठी जातात. तसेच काही शेतकऱ्यांची शेतीही बारामती तालुका हद्दीत मेखळी येथे आहे. मात्र मेखळीचा पूल वाहतुकीस बंद असल्याने त्यांची गैरसोय होत होती.परंतु मेखळी येथील पूल वाहतुकीस खुला झाल्यामुळे बारामती व फलटण भागातील गावच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत.

मेखळीचा पूल खुला झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनावश्यक वाहतूक देखील होत आहे.तसेच सध्या फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत आहे.त्यामुळे मेखळी व परिसरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.मेखळीतील पुलावरून फक्त अत्यावश्यक वाहतूक व्हावी,म्हणून याठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा