महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “भाई” यांच्या स्मृतीस उजाळा

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे पु.ल.देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ मुंबई येथे झाला. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात. मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीतकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लाभले.

पु. लं. चा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात  शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. त्यांचे  आजोबा वामन मंगेश दुभाषी हे कवी व साहित्याचे चांगले जाणकार होते. राबिद्रनाथ टागोर लिखित गितांजली हा काव्यसंग्रह तयांनी “अभंग गितांजली ” या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.

मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय होते. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले आहे.

मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्‌स‘ (NCPA) या संस्थेत पु लं नी अनेक प्रयोग केले. त्या संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लं नी जमा करून ठेवले आहे .

मराठी नाटकांचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी असा जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायची सुरुवात केली. NCPA च्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले. तसेच पु.ल. हे भाषाप्रेमी असल्याने त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज पणे सामील होत.

दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणासाठी माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांची मुलाखत घेणारे पु.ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी या दोन्हीच्या पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये मोजक्या आणि प्रतिभावंतांमध्ये पु.ल.देशपांडे यांचा समावेश होतो. २०१९ मध्ये त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून प्रसिद्ध दिगदर्शक महेश मांजरेकर यांनी “भाई व्यक्ती की वल्ली” हा चित्रपट काढला.

१२ जून २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी त्याचं पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

न्युज अन कट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा