अमेरिका आणि इतर युरोपीय देशांनंतर आता ब्रिटनमध्येही स्थलांतरिता विरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात गेल्या काही वर्षांत अंसतोष धुमसत आहे. अन्य देशातून स्थलांतरितांची संख्या वाढत असल्याने ब्रिटनच्या संस्कृतीला तडा जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. स्थलांतरित त्यांच्या त्यांच्या वाईट सवयी बरोबर आणीत असल्याने साहेबांना ते रुचत नाही. त्यामुळे त्यांचा असंतोष वाढत असून शनिवारी ब्रिटनमधील जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला.
नेपाळ, फ्रान्सनंतर आता ब्रिटनमध्येही लोक रस्त्यावर उतरले आहेत. जगभरच स्थलांतरितांविरोधात नाराजी वाढत आहे. त्यांना देशातून हाकलून लावण्याची मागणी होत आहे. ब्रिटनमध्ये शनिवारी कमी-अधिक प्रमाणात एक लाख लोक लंडनच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी देशातून बेकायदेशीर स्थलांतरितांना हाकलून लावण्याच्या मागणीसाठी मोठा निषेध मोर्चा काढवा. ‘युनाईट द किंगडम’ बॅनर असलेली ही रॅली लंडनच्या व्हाईटहॉल परिसरात आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचे आयोजन वादग्रस्त उजव्या विचारसरणीचे आणि राष्ट्रवादी नेते टॉमी रॉबिन्सन यांनी केले होते. त्यांना या वर्षी तुरुंगातून सोडण्यात आले. लंडनच्या रॅलीत मोठ्या संख्येने लोक युरोपीयन आणि ब्रिटिश ध्वज आणि सेंट जॉर्ज क्रॉस घेऊन उपस्थित होते आणि जमावाने ‘आम्हाला आमचा देश परत हवा आहे’ अशा घोषणा दिल्या. सरकारने बेकायदेशीर स्थलांतर थांबवावे, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य पुनर्संचयित करावे आणि ब्रिटिश संस्कृती आणि ओळख जपावी या मागणीसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॉबिन्सन यांनी रॅलीचे वर्णन भाषण स्वातंत्र्य, ब्रिटिश वारसा आणि संस्कृतीचे रक्षण’ असे केले. ते २०१० मध्ये बंदी घालण्यात आलेल्या ‘इंग्लिश डिफेन्स लीग’चे संस्थापक होते. या संघटनेच्या एका कार्यकर्त्यांना मशिदीवर बॉम्बस्फोट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांचे नॉर्वेजियन उजव्या विचारसरणीचे दहशतवादी अँडर्स बेहरिंग ब्रेविकशी संबंध होते.
त्याला ब्रिटनमध्ये अधिकृतपणे दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. त्यांनी असा दावा केला, की बेकायदेशीर स्थलांतरितांना आता स्थानिक समुदायापेक्षा कायदा आणि न्यायालयांमध्ये अधिक अधिकार मिळतात. हे ब्रिटिश जनतेसाठी न्याय्य नाही. देशात वाढती घुसखोरी हळूहळू ब्रिटिश ओळख धोक्यात आणत आहे. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला तुरुंगातून सोडण्यात आले. बदनामीचा खटला दाखल करणाऱ्या एका सीरियन निर्वासिताबद्दल खोटे दावे पुन्हा करू नयेत या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ऑक्टोबरमध्ये त्याला तुरुंगात टाकण्यात आले. अमेरिकन टेक अब्जाधीश एलन मस्क यांनी व्हिडीओ लिंकद्वारे लंडनमध्ये झालेल्या निदर्शनात भाग घेतला. जमावाला संबोधित करताना त्यांनी ब्रिटिश संसद विसर्जित करण्याची आणि सरकार बदलण्याची मागणी केली. स्थलांतराच्या भयानक लाटेने ब्रिटन हळूहळू नष्ट होत आहे आणि जर हे असेच चालू राहिले तर लोकांना एकतर लढावे लागेल किंवा मरावे लागेल, अशी चिथावणी त्यांनी दिली. आश्चर्य म्हणजे याच मस्क यांनी अमेरिकेत मात्र ट्रम्प यांच्या ‘अमेरिकन फर्स्ट’ या धोरणाला विरोध केला होता. दुसऱ्याच्या देशाच्या कारभारात नाक खुपसण्याची त्यांची खोड कायम आहे.
नेपाळ, फ्रान्समध्ये जसे आंदोलनाला हिंसक वळण मिळाले, तसेच ब्रिटनमध्येही झाले. रॅली दरम्यान निदर्शकांच्या काही लहान गटांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर बाटल्याही फेकल्या. मस्क यांची उपस्थिती आणि कट्टरपंथी भूमिका हे स्पष्ट करते, की अमेरिकन ‘मागा’ विचारसरणीचे समर्थक ब्रिटिश उजव्या विचारसरणीच्या चळवळींमध्ये सामील होत आहेत. काही लोक रॅलीमध्ये ‘मागा’ टोप्या घालून आले होते. अनेक विश्लेषक त्यांच्या आगमनाला ब्रिटन आणि अमेरिकेतील उजव्या विचारसरणीच्या चळवळींच्या आंतरराष्ट्रीय युतीचे लक्षण मानत आहेत. ‘मागा’ ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वयंघोषित चळवळ आहे. त्याद्वारे ते अमेरिका महान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे, स्थलांतराच्या मुद्द्यावर अमेरिकेत राजकीय ध्रुवीकरण वाढले आहे आणि ट्रम्प यांच्या उपस्थितीत ‘मागा’ समर्थक गट उदयास आले आहेत. ते स्थलांतरितांना विरोध करतात. चार्ली कर्कच्या हत्येनंतर लंडनमध्ये ही रॅली आयोजित करण्यात आली होती आणि त्यात ट्रम्प यांचे माजी मुख्य रणनीतिकार स्टीव्ह बॅनन आणि जर्मनीच्या ‘एएफडी’ पक्षाचे सदस्य, अमेरिकन आणि युरोपीयन उजव्या विचारसरणीचे लोक वक्ते म्हणून सहभागी झाले होते. उजव्या विचारसरणीच्या टॉमी रॉबिन्सनच्या रॅलीच्या निषेधार्थ, ‘स्टँड अप टू रेसिझम’ गटाच्या आयोजकांनी सुमारे पाच हजार लोकांची प्रति-रॅली आयोजित केली होती. आक्रमक रॅलीच्या तुलनेत त्यांचे नारे सहानुभूतीपूर्ण होते.
‘निर्वासितांचे स्वागत आहे’, ‘उजव्या पक्षांना पाडा’ आणि ‘उभे राहा, परत लढा’ अशा घोषणा देऊन विरोधी निदर्शकांनी वंशवाद आणि धर्मांधतेविरुद्ध आवाज उठवला. खासदार डायन अॅबॉट यांनी व्यासपीठावरून सांगितले, की वंशवाद आणि हिंसाचार नवीन नाहीत. त्यांचा नेहमीच पराभव झाला आहे आणि आता त्यांना पुन्हा पराभूत करावे लागेल. आपल्याला निर्वासितांसोबत एकता दाखवावी लागेल. अॅबॉट यांनी रॉबिन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अफवा पसरवल्याचा आरोप केला आणि म्हटले, की स्थलांतरितांचा धोका आहे अशी अटकळ करण्याऐवजी त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण केले पाहिजे. ब्रिटनमध्ये स्थलांतर हा एक प्रमुख राजकीय मुद्दा बनला आहे. अलिकडच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे, की ‘रिफॉर्म युके’ सारख्या पक्षांना जनतेचा पाठिंबा मिळत आहे. या संघर्षात एकूण २६ अधिकारी जखमी झाले आहेत, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, द्वेषपूर्ण गुन्हे आणि हल्ल्यांसाठी २५ निदर्शकांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले, की अनेक लोकांनी कायदेशीर निषेधाचा अधिकार वापरला असला, तरी एका दंगलखोर गटाने जाणूनबुजून हिंसाचार केला.
युरोप आणि अमेरिकेत वाढत्या राष्ट्रवादी-स्थलांतरित-विरोधी भावना प्रतिबिंबित करणाऱ्या मोठ्या उजव्या विचारसरणीच्या लाटेचा भाग आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये स्थलांतर-विरोधी लाटा जोर धरत आहेत. उदाहरणार्थ, जुलै २०२५ मध्ये, पोलंडच्या उजव्या विचारसरणीच्या कॉन्फेडेराजा पक्षाने ‘अनियंत्रित स्थलांतर थांबवा’ या घोषणेसह देशातील अनेक शहरांमध्ये निषेध मोर्चे आयोजित केले. याशिवाय, उत्तर आयर्लंड आणि नेदरलँड्समध्येही अशीच निदर्शने पाहायला मिळाली आहेत. ब्रिटनमध्येही स्थलांतर आता एक प्रमुख राजकीय मुद्दा बनला आहे.‘ रिफॉर्म युके’ सारख्या पक्षांना जनतेचा पाठिंबा मिळत आहे आणि जर आता निवडणुका झाल्या तर ते सर्वात मोठा पक्ष बनू शकतात. या रॅलीमुळे ब्रिटिश राजकारणात स्थलांतर-विरोधी आणि उजव्या विचारसरणीच्या चळवळींना एक नवीन रूप मिळाले आहे. येत्या काळात ‘रिफॉर्म युके’ची लोकप्रियता आणि स्थलांतराविरोधातला संघर्षही वाढू शकतो.
ऑगस्टमध्ये, जवळजवळ अर्ध्या ब्रिटिशांनी (४८ टक्के) स्थलांतरित ही ब्रिटनसमोरील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक मानले. अलिकडच्या काही महिन्यांत वाढत्या स्थलांतराविरोधात सार्वजनिक चिंता असतानाच अधिकृत आकडेवारी दर्शवते, की २०११ पासून दरवर्षी निव्वळ स्थलांतर दोन ते ती लाखांच्या दरम्यान आहेत. तथापि, २०२० मध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ब्रेक्झिट लागू झाल्यापासून, स्थलांतरितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तथापि, अलीकडील आकडेवारी दर्शवते, की स्थलांतरितांती लाट कमी होत आहे. २०२४ मध्ये निव्वळ स्थलांतर कमी झाले आणि अलिकडच्या नियम बदलांमुळे ते आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. युक्रेनियन युद्ध किंवा तालिबानमधून कमी लोक स्थलांतरित होत आहेत. विद्यार्थी व्हिसामध्येही घट झाली. २०२४ च्या तुलनेत ऑगस्टमध्ये विद्यार्थी अर्जांमध्ये १८ टक्के घट झाली. ब्रिटनमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाण विद्यार्थ्यांचे आहे. दुसरा सर्वात मोठा गट म्हणजे वर्क व्हिसावर असलेले लोक. त्यांचे प्रमाण २० टक्के आहे, तर इतर व्हिसावर असलेले लोक ११ टक्के आहेत. यावरून तिथे स्थायिक होण्यासाठी आलेल्यांचे प्रमाण कमी असते, तरीही ब्रिटिशांच्या मनात अस्वस्थता कायम आहे.
भागा वरखडे











































