पुणे, 25 जानेवारी 2022: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा धोका सातत्यानं वाढत आहे. हे लक्षात घेऊन, अमेरिकन संरक्षण विभाग, पेंटागॉनने पूर्व युरोपमध्ये तैनातीसाठी 8,500 अमेरिकन सैनिकांना ‘हाय अलर्ट’ वर ठेवलंय. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितलं की, सैनिकांमध्ये लढाऊ पथकाचे सदस्य, आरोग्य कर्मचारी, गुप्तचर आणि पाळत ठेवणे पथके यांचा समावेश आहे.
जॉन किर्बी म्हणाले, ‘आतापर्यंत या सैनिकांच्या तैनातीसाठी कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत किंवा त्यांना कोणतेही मिशन नेमण्यात आलेले नाही. मात्र, पूर्व युरोपमधील नाटोला बळकट करण्यासाठी या भागात अमेरिकन सैन्य तैनात केलं जाऊ शकतं. युरोपमध्ये अतिरिक्त अमेरिकन सैन्याची तैनाती नाटोच्या निर्णयावर आधारित असेल.
जॉन्सन यांनी पुतीन यांना दिला इशारा
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युक्रेनवर हल्ला झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. रशियन सैन्यानं फेब्रुवारीमध्ये आयर्लंडच्या किनाऱ्यापासून 150 मैल अंतरावर सागरी लष्करी सराव करण्याची घोषणा केल्यानंतर जॉन्सनचे हे वक्तव्य आलं आहे. रशियाने अटलांटिक, पॅसिफिक, भूमध्य आणि उत्तर समुद्रात आपल्या 140 युद्धनौकांसह युद्धाभ्यास जाहीर केले आहेत.
UN म्हणाले – राजकीय संवादानं संकट टाळा
युक्रेन आणि रशियामधील तणाव कमी करण्यासाठी युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी राजकीय संवाद सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, “युनायटेड नेशन्स दोन्ही देशांमधील समस्या युद्धाऐवजी संवादानं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.” आम्ही सर्व बाजूंना आवाहन करतो की, परिस्थिती युद्धापर्यंत पोहोचू नये म्हणून तातडीनं पावलं उचलावीत.
ब्रिटनने युक्रेनला दिली एंटी टैंक गाइडेड मिसाईल
संभाव्य रशियन हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी ब्रिटनने युक्रेनला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक टँकविरोधी क्षेपणास्त्रं आणि अँग्लो-स्वीडिश अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रं सुपूर्द केली आहेत. असं मानलं जातं की रशियन बाजूने रणगाड्यांसह युक्रेनच्या सीमेवर प्रथम हल्ला करणे अपेक्षित आहे. नाटोच्या लष्करी तज्ज्ञांच्या मते, रशियाने युक्रेनच्या सीमेवर सुमारे 8,000 रणगाडे तैनात केले आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमेवर 36 इस्कंदर क्षेपणास्त्र प्रक्षेपक देखील तैनात केले आहेत.
अमेरिका करू शकते थेट कारवाई
रशिया आणि युक्रेनमध्ये जी परिस्थिती निर्माण झालीय, त्यात अमेरिकेनेही थेट कारवाई करण्याचं ठरवलं आहे. शनिवारी मेरीलँडमधील पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी बिडेन यांना रशियाशी व्यवहार करण्यासाठी अनेक पर्याय सादर केले. यापैकी एक म्हणजे रशियावर लष्करी दबाव आणण्यासाठी अमेरिकेचे सैन्य, लढाऊ विमानं आणि युद्धनौका रशियाच्या जवळच्या देशांमध्ये तैनात करणं. या देशांमध्ये 1 ते 5 हजार अमेरिकन सैनिक कधीही पाठवले जाऊ शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे