मुंबई, 19 मार्च 2022: ब्रिटानिया इंडस्ट्रीजने 2024 पर्यंत महिलांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे मुख्य विपणन अधिकारी (सीएमओ) अमित दोशी यांनी सांगितले की, सध्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण 38 टक्के आहे. दोशी म्हणाले, “कंपनीमध्ये आम्हाला लैंगिक समानतेचा प्रचार करायचा आहे.”
एफएमसीजी उत्पादने बनवणाऱ्या कंपनीच्या गुवाहाटी कारखान्यात काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण 60 टक्के आहे. कंपनी ही संख्या ६५ टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचे दोशी यांनी सांगितले.
महिलांसाठी स्टार्टअप आव्हान
दोशी यांच्या म्हणण्यानुसार, महिलांना सक्षम करण्यासाठी कंपनीने महिला उद्योजकांसाठी ‘स्टार्टअप चॅलेंज’ आधीच सुरू केले आहे. कंपनीने आतापर्यंत 30 महिला उद्योजकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे प्रारंभिक भांडवल प्रदान केले आहे. ही रक्कम महिला उद्योजकांना ई-कॉमर्स, डिजिटल सेवा, मोबाईल व्हॅनद्वारे डोळ्यांची काळजी आणि मुलांचे शिक्षण यासारख्या क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दोशी म्हणाले की, कंपनीने देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी गुगलशी करार केला आहे.
जाणून घ्या कंपनीबद्दल
100 वर्षांचा वारसा असलेली ही भारतातील प्रमुख खाद्य कंपन्यांपैकी एक आहे. ही वाडिया ग्रुपची कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. कंपनीचा वार्षिक महसूल 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनी Good Day, Tiger, NutriChoice, Milk Bikis आणि Marie Gold या ब्रँड नावाने खाद्यपदार्थांची विक्री करते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये बिस्किटे, ब्रेड, केक, रस्क आणि डेअरी उत्पादने समाविष्ट आहेत.
कंपनीचे 60 पेक्षा जास्त देशांमध्ये अस्तित्व आहे. युएई आणि ओमानच्या टॉप बिस्किट ब्रँडमध्येही कंपनीचा समावेश आहे. कंपनी नेपाळमधील आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे