बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक लढवणार, शेतकरी आणि दलितांच्या हक्कांवर बोलणार

लोहा, २७ मार्च २०२३: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल म्हणजेच रविवारी घोषणा केली की बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक लढवेल आणि संपूर्ण राज्यात पक्षाचा सर्व स्तरांवर विस्तार करेल. जिल्हा परिषद निवडणुकीत गुलाबी झेंडा दिसणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक गावात सभासदत्व मोहीम सुरू करण्यात येणार आहे. रॅलीला संबोधित करताना केसीआर म्हणाले की, शेतकरी आणि दलितांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याची घोषणा केली.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवत मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने ५० कोटी रुपये द्यावेत. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचा विमा द्यावा आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा, तरच आम्ही महाराष्ट्रात न येण्याचा विचार करू, अन्यथा आम्ही महाराष्ट्राचा दौरा करत शेतकऱ्यांसाठी लढा देत राहू, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले.

केसीआर म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली आहेत, त्यापैकी काँग्रेसने ५४ वर्षे आणि भाजपने १६ वर्षे राज्य केलं. मात्र शेतकऱ्यांची अवस्था पूर्वीसारखीच आहे. त्यामुळंच आमच्या सरकारने यावेळी किसान सरकार असा नारा दिलाय. शेतकऱ्यांना एकत्र येऊन आमचं सरकार बनवावे लागेल, सरकारला टोला लगावताना केसीआर म्हणाले की, ते शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भिक देतात, दहा हजार रुपये का देत नाहीत? शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारकडं भीक मागण्याची गरज नाही.

आमचं सरकार दलित बंधू योजनेंतर्गत दलित तरुणांना दहा लाखांची रक्कम देतं. ज्याला परतावावे लागत नाही. जोपर्यंत अशी योजना येथे येत नाही तोपर्यंत मी महाराष्ट्रात येत राहीन आणि त्यांच्या हक्कासाठी लढत राहीन, असं मुख्यमंत्री म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा