‘चेंबरमध्ये काम करा’ आदेश देणारा ‘तो’ अधिकारी कोण?

पिंपरी-चिंचवड येथील निगडी प्राधिकरणामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी बीएसएनएलच्या चेंबरमध्ये गुदमरून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडल्यानंतर दोन महिने उलटले, तरी या प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. या कर्मचाऱ्यांना चेंबरमध्ये उतरण्याचे आदेश देणारा ‘तो’ बीएसएनएल अधिकारी कोण? याचे उत्तर पोलिसांना अजूनही मिळालेले नाही.

घडलेल्या घटनेनंतर ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे. मात्र, या गंभीर प्रकरणात महापालिकेने राष्ट्रीय सफाई आयोगाला सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे ठेकेदार आणि बीएसएनएलची चूक असल्याचे नमूद केले आहे. असे असूनही, कामाचा आदेश देणाऱ्या बीएसएनएलच्या दोषी अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या अधिकाऱ्याची ओळख पटवण्यात पोलीस प्रशासन कमी पडताना दिसत आहे.

राष्ट्रीय सफाई आयोग आणि अनुसूचित जाती-जमाती आयोगाने घटनेची दखल घेतल्यानंतर पोलिसांच्या तपासाला गती मिळाली. पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करून अटक केली. ‘बीएसएनएलच्या संबंधितांवरही गुन्हा दाखल केला आहे,’ असे पोलिसांनी आयोगाला कळवले असले तरी, हे ‘संबंधित‘ अधिकारी नेमके कोण, याची माहिती मात्र गुलदस्त्यातच आहे.

निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली आहे, परंतु कागदपत्रे आणि आवश्यक माहिती त्यांच्याकडून अजूनही उपलब्ध झालेली नाही.’

जिल्हा दक्षता समितीचे सदस्य सागर चरण यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘गोरगरिबांचे जीव एवढे स्वस्त झाले आहेत का? मृतांच्या नातेवाइकांना शासनाने व महापालिकेने तातडीने मदत करावी, तसेच दोषी ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

कामाचा थेट आदेश देणारा अधिकारी सापडत नाही, तोपर्यंत मृतांच्या कुटुंबीयांना न्याय कसा मिळणार, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे